Beast of no Nation नंतर पाहिलेला हा दुसरा आफ्रिकन सिनेमा . या दोन्ही आफ्रिकन चित्रपट पाहिल्यावर लक्षात येत की यांच्या जगण्यातले मूलभूत प्रश्न कोणताही मनोरंजनाचा रंग न चढवता आपल्यासमोर मांडत आहेत. आणि दोन्ही चित्रपट पाहिल्यावर ते तीव्रतेने जाणवलं. आपल्या मसाला फिल्म्स पाहणाऱ्या प्रेक्षकांना हे चित्रपट एकदम बोरं वाटतील.
चित्रपटात आफ्रिकेतील दुष्काळी भागातील एका शेतकऱ्याची कथा दाखवली आहे. आफ्रिकन खंडातील मागासलेल्या लोकांचं आयुष्य नेमकं कस असतं हे उत्तमरित्या आपल्याला यातून कळतं. औद्योगिकरणापासून वंचित असलेला प्रदेश, समाजातील मूलभूत प्रश्न सोडवू न शकणार सरकार त्यांच्याकडून होणार शोषण आणि भयंकर असणार दारिद्र. या सगळ्यातून फक्त शिक्षणाच्या आशेवर यातून मार्ग काढणार विल्यम.
चित्रपटातील मुख्य पात्र म्हणजे विल्यम, एका शेतकरी कुटुंबातील हुशार मुलगा. अचानक पडलेला जास्तीचा पाऊस आणि पूढील वर्षी पडलेला दुष्काळ यामध्ये जे काही घडत तो म्हणजे चित्रपटाचा गाभा आहे. याच काळात त्याला आपलं शिक्षण सोडावं लागत. मग त्यातून त्याच्या आयुष्याचा प्रवास कसा पुढे सरकत जातो. त्यासमोर केवळ एकच पर्याय असतो म्हणजे आपल्या वडिलांसोबत शेतीत कष्ट करायचं. आणि तो हाच पर्याय वेगळ्या पध्दतीने स्वीकारतो. पण कसा यासाठी तुम्ही चित्रपट नक्की पहा.
चित्रपटात दाखवलेलं दारिद्र्य आपल्याला चित्रपट पाहताना अस्वस्थ करत. पण यात दाखवल्या सारखीच परिस्थिती असणारा खुप मोठा वर्ग आपल्याकडे आहे. ज्यांना उद्या उठल्यावर काय खायचं हा प्रश्न पडलेला असतो. त्यांच्यापर्यंत ना अजून सरकार पोहचू शकलंय ना आपण, पण त्यांच्या समस्या मांडणारा चित्रपट आपल्याकडे तयार होणार नाही आणि झाला तरी त्याला म्हणावा तसा प्रेक्षक मिळणार नाही. तरी देखील हा चित्रपट आवर्जून बघा, कारण परिस्थितीवर मात करणारा एक विल्यम आपल्या प्रत्येकात तयार झाला पाहिजे.
– रितेश साळवे