| ता ०६ | चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे जवळपास सगळ्या जगाला ताळेबंदी करावी लागली. आणि पर्यायाने असंख्य सामाजिक, आर्थिक प्रश्न निर्माण झाले. याची झळ भारतालाही बसली. भारतात विशेषतः महाराष्ट्रात पोटासाठी परराज्यातून मोलमजूरीसाठी येणार्या लोकांसमोर आणि इतरत्र सर्वच लोकांसमोर पोटाचा प्रश्न ऊभा राहिला. आणि पर्यायाने फाळणीनंतर झालेल्या स्थलातंरानंतर सगळ्या मोठं स्थलांतर होऊ लागलं आणि तेही शक्य होईल तसं. मग या सगळ्यात अचानक सोनू सुद नावाचा अभिनेता स्थलांतरीत मजूरांच्या मदतीला धावून येतो. शक्य होईल तशी, तेवढी मदत करतो.
हजारो मजूरांना आपल्या गावी स्वखर्चाने पोहचवतो, सगळीकडे फक्त याच गोष्टीची चर्चा होते. मग या सगळ्यात नक्की ‘सरकारचं काय काम आहे किंवा सरकार का हे करू शकत नाही?’ हा प्रश्न लोक विसरत असतील तर मग सरकारचं अपयश ईथं लपलं जातंय का ? सोनू सुद नावाचा एक अभिनेता अशा जागतिक महामारीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत करतो हे नक्कीच कौतुकास पात्र असलं तरी अशी परिस्थिती होण्याईतपत पुर्वनियोजन नसणं हे सरकारचंच अपयश आहे अस म्हणायला काही हरकत नाही.
आंतरराष्ट्रीय श्रम संघाच्या अहवालानुसार भारतातील ९०% वर्ग हा अनिश्चित, अनौपचारिक श्रेत्रात काम करतो. जिथं किमान वेतन ही निश्चित नसतं. आणि या ताळेबंदीमुळे भारतातील सुमारे ४०० दशलक्ष लोक हे अजूनच गरिब होऊ शकतात. एकूण स्थलातंरीत लोकांपैकी 139 दशलक्ष एवढे लोक हे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश अशा राज्यातून आहेत. मग या गोष्टींवर सरकारचं नक्कीच काहितरी नियोजन हवं होतं.
सोनू सुद याच्यापलिकडे जाऊन जेवढ्या गरजूंची माहिती त्याच्यापर्यंत पोहचते त्या सर्वांची तो स्वतःच्या विशिष्ट पद्धतीतून ट्विटरवरती प्रतिक्रिया देऊन मदत करताना दिसत आहे. यामध्ये दोन मुली स्वतःनांगरणी करत असतानाचा विडीओ वायरल झाल्यानंतर त्या कुटुंबाला मदत म्हणून ट्रॅक्टर दिला, तेलंगणातील यदाद्री येथल्या ३ अनाथ मुलांना दत्तक घेतलं आज आसाम मधल्या एका गरीब बाईला रक्षाबंधनची भेट म्हणून घर देण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या सोनुच्या कामामुळे त्याचं सर्वत्रच कौतुक होत आहे.
फक्त सोनुनेच नाहीतर खूप लोकांनी या महामारीमध्ये लोकांना मदत केली आहे. रतन टाटांनी १५०० कोटींचा निधी मदत म्हणून दिला आहे. मग हे सगळं कौतुकास्पद असलं तरी मग सरकार काय करतंय? हा प्रश्न लोकांना पडलाय. हीच लोकं मदतीचे काम करणार असतील तर सरकार का शकत नाही? मग जनतेने भरलेला कर काय केला जातोय आणि आकस्मिक, आपत्तीकालीन निधी कुठं वापरला जातो ?
– तुषार धायगुडे