| ता ०७ | अयोध्यामध्ये राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर सोशल मीडियावर कोर्टाने दिलेल्या पाच एकर जमिनीवर सुन्नी वक्फ बोर्ड एम्स मसारखं मोठं हॉस्पिटल बांधणार आहे, अशी पोस्ट व्हायरल झाली होती. त्याचबरोबर प्रसिद्ध डॉक्टर काफिल खान हे त्याचे प्रमुख असतील अशा स्वरूपाची पोस्ट होती. या हॉस्पिटलला बाबरी हॉस्पिटल नाव दिलं जाईल असे देखील पोस्टमध्ये म्हटलं होतं.
तसेच हॉस्पिटलचा एक मजला लहान मुलांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचा दावादेखील पोस्टमध्ये केला होता. हॉस्पिटल सोबत ग्रंथालय, इस्लामिक रिसर्च सेंटर यांचीदेखील निर्मिती करण्यात येणार असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता. मात्र सुन्नी वक्फ बोर्ड, उत्तर प्रदेश यांनी दिलेल्या माहितीनुसार हा दावा खोटा असल्याचे सांगितलं आहे.
सुन्नी वक्फ बोर्डाचे सीईओ सय्यद मोहम्मद शोएब म्हणाले की हॉस्पिटल, ग्रंथालय, इस्लामिक रिसर्च सेंटर ही प्रस्तावित कामे अजून त्यांच्यावर शिक्का मोर्तब झालेलं नाही. अलीकडेच सुन्नी वक्फ बोर्डाने पंधरा जणांचा इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्ट स्थापन केला आहे. ही लोकं लवकरच प्रस्तावित कामांवर निर्णय घेतील व 5 एकर जमिनीवर नेमकं काय उभारायचं आहे हे निश्चित करतील.
त्यामुळे पाच एकर जमिनीवर काय बांधायचं आहे हे अजूनही ठरलं नसल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं. तसेच खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पण बोर्डाने सांगितलं आहे.
निष्कर्ष: बातमी अंशतः खोटी
- दिगंबर दगडे