| ता ०९ | केंद्रीय मंत्री अर्जून मेघवाल यांना कोरोनाची लागण झाली असून दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यावर त्यांनी स्वतःची दोन वेळा कोरोना चाचणी केली होती. त्यातील दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली. अलीकडेच भाजपच्या या मंत्र्याची एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
‘भाभीजी कंपनी’नं बाजारात आणलेलं पापड खाल्ल्याने शरीरात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात असा दावा त्यांनी या व्हिडिओत केला होता.आता मात्र त्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेअंतर्गत केंद्रीय मंत्री अर्जुन मेघे यांनी भाभीजी पापडाचा व्हिडिओ तयार केला होता. याच व्हिडिओमध्ये पापड खाल्ल्याने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात, असं अवैज्ञानिक विधान केलं होतं.
अर्जून मेघवाल यांचं विधान अवैज्ञानिक का?
कंपनीने पापडात हिंग हळद काळीमिरी यासारख्या मसाल्यांचा वापर केल्याचा दावा केला आहे. हे घटक शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. मात्र त्यांच्या सेवनाने शरीरात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात, हे अजूनही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे अशाप्रकारचे विधान करणं हे विज्ञानाला धरून नाही. सध्याच्या काळात राजकीय नेत्यांकडून लोकांना शारीरिक अंतर ठेवा, साबणाने हात स्वच्छ धुवा, बाहेर गेल्यानंतर तोंडाला मास्क लावावा या सारख्या सूचना देणे अपेक्षित आहे. मात्र अर्जून मेघवाल यासारख्या नेत्यांची विधान वैज्ञानिक दृष्टीचा अभाव अधोरेखित करणारी आहेत.
- दिगंबर दगडे