या देशाचा मुख्य प्रवाह असणारा बहुजन, दलित, आदिवासी वर्ग या देशातल्या मुठभरांनी कायम शिक्षणाच्या परिघात येऊ दिलेला नाही. कायम पारंपारिक कौशल्य आणि त्यावर आधारित उपेक्षित जगण्याला भिडत हा मुख्य प्रवाह आपले मार्ग शोधतोय. दीडशे वर्ष आधी महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई आणि फातीमाबिबी यांनी शिक्षण बहुजनांच्या दारात आणून सोडल्यापासून नव्या जगण्याच्या शक्यता निर्माण झाल्यात. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना शिक्षणाचे शस्त्र लक्षात घेऊनच त्याला माणसांचा मुलभूत अधिकार बनवण्याचे प्रयत्न केलेले पण इथल्या सरंजामी ब्राह्मणी शक्तींनी त्याला कायम विरोधच केला आणि तो मुलभूत हक्क मिळवण्यासाठी ६० वर्ष लढावे लागले या देशाच्या मुलनिवासींना. अजुनही लाखो मुले आणि मुली शिक्षणापासून वंचित आहेतच.
शाळा कशाही असोत, तिथे शिक्षण गुणवत्तापूर्ण असो नसो, शाळा फार महत्वाच्या असतात. कारण, त्या वाचवतात मुलांना उपाशी राहण्यापासून, दिवसभर वणवण फिरण्यावाचून, लहानपणीच बालमजूर म्हणून काम सुरु करण्यापासून, न कळत्या वयातच लग्नाला उभे राहण्यापासून.
गेल्या सहा महिने आधी कोरोना काळ सुरु झाला तेव्हा लॉक डाऊन सुरु झाले. एका क्षणात सगळा देश बंद पडला आणि हजारो, लाखोमजूर रस्त्यावर आलेत. प्रदेशात अडकलेल्या खऱ्या इंडियन्स लोकांना आणण्यासाठी भारत सरकारने तातडीने सोय केलेली, पण भारतीय मजुरांसाठी बसेस आणि रेल्वे सोडणे सरकारला जमले नाही. आणि लाखो मजूर रस्ताने चालत, मरत गावांकडे निघाले. त्यात कित्येक मुलेही होती. त्यांतील काहींच्या भारी स्टोरीज मेडीयाने केल्यात पण त्यांचे बालपण कोरोनाने सगळ्यात पहिले काढून घेतले.
शहरी वस्त्या, इमारती आणि झोपडपट्टयांमध्ये अडकून पडलेल्या लाखो मुलांनी आपला मोकळा अवकाश गमावला. दहा बाय दहाच्या झोपड्यांमध्ये चोवीस तास अडकून पडलेल्या मुलांनी भूक, उपासमारीसोबतच हालचालींवर आलेली बंधने ही सहन केलींत. सतत हालचाल करणाऱ्या, पळापळ करणाऱ्या आणि घराबाहेर मोकळा श्वास घेणाऱ्या मुलांची ही मानसिक गरज कोणाच्या लक्षातही यायचं कारण नाही. करियर, स्पर्धा आणि पुढे जाण्याच्या वेगाला खीळ बसल्याने चिंताग्रस्त झालेल्या बहुसंख्य समाजात आणि शिक्षण क्षेत्रात शिक्षण सुरु ठेवण्याची धडपड सुरु असताना निघाला ऑन लाईन शिकवण्याचा पर्याय. यातले सगळ्यात महत्वाचे गृहीतक म्हणजे सगळ्याच मुलांकडे स्मार्ट फोन्स आहेत. ते वापरायला लागणारे इंटरनेट उपलब्ध आहे आणि ते वापरायचे कौशल्य सगळ्यांकडे आहे. या काळात झालेल्या वेगवेगळ्या अभ्यासातून दिसून येते की साधारणपणे चाळीस ते पन्नास टक्के पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत. कोरोना काळात रोजगार गेल्याने फोन रिचार्ज करण्यासाठीही पैसे उपलब्ध नाहीत. ज्या घरात एकच फोन आहे आणि मुलं जास्त आहेत तिथे मुलीची कुचंबणा होतेय. ऑन लाईन शिकवण्याची कौशल्य नसलेले शिक्षक, शिकवण्याची गती आणि साधनांसोबत जुळवून घेताना मुलांची होणारी धडपड प्रचंड त्रासदायक आहे.
हाताला काम नाही, खिशात पैसे नाहीत आणि मुलांना शिकवायचे आहेच, यातून होणाऱ्या ओढाताणीत आत्मसन्मान गमावून बसणारे हतबल पालक आपल्याला आपल्या आसपास दिसताहेत आणि यातून वाढताहेत पालकांच्या आणि मुलांच्या आत्महत्या. भारताच्या जातीय आणि वर्गीय संरचनेत या होणाऱ्या आत्महत्या दलित, वंचित समुहातील आहेत हे वास्तव आपण बघतो आहोतच. केरळमधल्या वेदिकाने घेतलेला हा मार्ग आता अनेकानेक गावांमध्ये मुल घेत आहेत.
पालक जेव्हा रोजच्या जगण्याची लढाई लढत असतात, तेव्हा कुटुंबावर होणारा कोणताही आर्थिक आघात पहिले मुलांच्या शिक्षणावर आणि महिलांच्या आरोग्यावर होत असतो. आज पाच महिने कोरोनामुळे काही व्यवसाय पूर्ण बंद, काही बहुतांश काळ बंद असलेले, अनेक रोजगार नष्ट झालेले तर अशा परिस्थितीचा पहिला बळी पडले ते वंचितांच्या मुलांचे शिक्षण. आज अनेक मुले शाळा बंद असल्याने भंगार गोळा करण्यापासून, मिळेल ते काम घेत घर जगवण्याच्या प्रयत्नात दिसताहेत. अनेक मुली रानात काम करताना दिसताहेत. स्थलांतरीत मजुरांची मुले, जी सतत शाळा बदलत फिरत असतात त्यांना आधीच शिक्षणात सामावून घेण्याची मानसिकता आणि तयारी शाळांची नसते ती मुले आता सलग शाळेच्या बाहेर असल्याने त्यांचे शिक्षण पुढे सुरु होण्याची शक्यता नष्ट होताना दिसते. घरी असणाऱ्या, शाळा सुटलेल्या मुली वेळेआधीच लग्नासाठी उभे राहण्याचा धोका असतो ते आता येत्या लग्नाच्या सीजन मध्ये दिसेल.
कोरोनाने घेतलेला सगळ्यात मोठा बळी म्हणजे वंचित, कष्टकरी, दलित, आदिवासी मुलामुलींचे शिक्षण आहे.
– परेश जयश्री मनोहर
वाघळवाडी
९८२२९१४७५१/[email protected]