सडक-2 चित्रपटाचा ट्रेलर जगातील सर्वात जास्त डिसलाइक मिळवणारा तिसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ ठरला आहे. आतापर्यंत या ट्रेलरला एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी डिसलाइक केलं आहे. आलिया भट आणि आदित्य राॅय यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आहे.
महेश भट यांची निर्मिती असलेला सडक 2 चित्रपटाचा ट्रेलर 12 ऑगस्टला युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला होता. त्या दिवसापासून बॉलीवूडमधील नेपोटिझमला विरोध दर्शवण्यासाठी अनेक नेटकऱ्यांनी या ट्रेलरला नापसंती दर्शवली. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड मधील नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत आला होता.
ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्यावर दोन दिवसातच जवळपास 93 लाख लोकांनी या व्हिडिओला नापसंती दर्शवली होती.
सडक-2 चा ट्रेलर भारतातील सर्वात जास्त डिसलाइक मिळवणारा पहिल्या क्रमांकाचा व्हिडिओ ठरला आहे.
सडक-2 चित्रपट 1991 मधील सडकचा सिक्वेल असून 18 ऑगस्टला हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे. आलिया भट, आदित्य रॉयसोबत संजय दत्तने यात महत्वाची भूमिका साकारली आहे.
जगात सर्वात जास्त डिसलाइक मिळवणाऱ्या व्हिडिओमध्ये युट्युबचा स्वतःचाच व्हिडिओ ‘युट्युब रिवाईंड 2018’ पहिल्या क्रमांकावर आहे. या व्हिडिओला एक कोटी 82 लाख लोकांनी डिसलाइक केलं आहे. तर जस्टीन बायबरचं ‘बेबी’ हे गाणं दुसऱ्या क्रमांकावर आहे. या गाण्याला एक कोटी 10 लाख लोकांनी डिसलाइक केलं आहे.