सुप्रीम कोर्टाने नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला असून ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार हे आता निश्चित झालं आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी ही याचिका फेटाळून लावली.
‘परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यास विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात येईल’
जेईई आणि नीट परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. कोरोना काळात परीक्षा न घेता त्या पुढे ढकलण्यात याव्यात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणं होतं. मात्र ‘या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यास विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात येईल’, असं सांगून न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी ही याचिका फेटाळून लावली.
परीक्षा नियोजित तारखेलाच होणार
जेईई मेन परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या काळात होणार असून नीट परीक्षा 13 सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे कसल्याही परिस्थितीत ही परीक्षा सप्टेंबर महिन्यातच घेण्यात येणार आहे.
हा निर्णय देताना न्यायाधीश मिश्रा म्हणाले की ही कोरोनामुळे आयुष्य थांबवता येऊ शकत नाही सुरक्षित उपाययोजनांच्या सोबत सगळ्यांना पुढे जावं लागणार आहे. तुम्ही विद्यार्थ्यांचे एक वर्षे वाया घालवणार का? असा प्रश्न देखील त्यांनी याचिकाकर्त्यांना विचारला.
जेईई आणि नीट या महत्त्वाच्या परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येणार आहेत.