वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्राने भारतात फेसबुककडून भाजप नेत्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
भाजपच्या काही नेत्यांनी अल्पसंख्यांकांविषयी द्वेष पसरवणारी पोस्ट फेसबुक वर केली होती. या पोस्ट मुळे फेसबुकच्या धोरणांचे उल्लंघन झालं तरीदेखील व्यवसायिक कारण देत या नेत्यांवर कारवाई करण्यास फेसबुकने नकार दिला, असं देखील वाॅल स्ट्रीट जर्नेलने म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
तेलंगणाचे बीजेपी आमदार टी राजा सिंग यांनी अल्पसंख्यांक विरोधात हिंसा करा, अशा आशयाची पोस्ट फेसबुक वर केली होती. त्यानंतर फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनी ‘धोकादायक व्यक्ती आणि संघटना’ या धोरणांतर्गत टी राजा सिंग यांना फेसबुक वापरण्यावर बंदी घालण्याची तयारी केली होती.
मात्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार आंखी दास यांनी भाजपच्या नेत्यांनी जरी फेसबुकच्या धोरणांचं उल्लंघन केलं असलं, तरी त्या संदर्भात कोणतीही कारवाई करू नये असे कर्मचाऱ्यांना सांगितलं. भारतात फेसबुकला व्यावसायाच्या दृष्टीने धोका निर्माण होईल, असं कारण आंखी दास यांनी पुढं केलं.
आंखी दास या फेसबुकच्या भारतातील पब्लिक पाॅलिसी डायरेक्टर आहेत.
द इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने टी राजा सिंग यांना संपर्क केल्यावर ते म्हणाले की, आमचं अधिकृत पेज 2018 मध्ये फेसबुकनं बंद केलं आहे. त्यानंतर देशभरातील कार्यकर्त्यांनी अनेक पेज तयार केली आहेत. त्यांच्यावर आमचं नियंत्रण नाही.
फेसबुककडून आरोपांचं खंडन
फेसबुकच्या प्रवक्त्याने द वॉल स्ट्रीट जर्नलच्या आरोपांचे खंडन करून सांगितलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने द्वेष पसरवणारी, धार्मिक भावना भडकवणारी पोस्ट फेसबुक वर केली तर त्यावर निश्चित कारवाई केली जाते. ती व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षाशी संलग्न आहे का याचा विचार केला जात नाही.
द वॉल स्ट्रीट लेखामुळे इंटरनेटवर खळबळ माजली. त्यानंतर फेसबुकच्या भारतातील पब्लिक पाॅलिसी डायरेक्टर आंखी दास यांच्याविरोधात धमकीचे लेख सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. आंखी दास यांनी या विषयीची तक्रार दिल्ली पोलीस सायबर सेलकडे केली आहे.
सध्या सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारे लेख फोटो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या प्रकरणावर अपेक्षेप्रमाणे भाजप आणि काँग्रेसमध्ये टीका आणि आरोपांचं राजकारण सुरू झालं आहे.
राहुल गांधींचा भाजपवर आरोप
राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून आर एस एस आणि भाजपवर निशाणा साधला. व्हाट्सअप आणि फेसबुकच्या मदतीने भाजप खोट्या बातम्या पसरवतात आणि त्याचा वापर मत मिळवण्यासाठी करतात, असा आरोप त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केला.
एवढेच नाही तर आर एस एस आणि भाजपकडून भारतात फेसबुक आणि व्हाट्सअप नियंत्रित केलं जातं. हेच सत्य आता अमेरिकन मीडियानं समोर आणल्याचं देखील त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांचं प्रत्युत्तर
राहुल गांधींच्या ट्विटला केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘राहुल गांधीना आपल्या पक्षातील लोकांवर नियंत्रण ठेवता येत नाही. संपूर्ण जगावर आर एस एस आणि भाजपचे नियंत्रण आहे असं त्यांना वाटतं. मात्र फेसबुक आणि केंब्रिज अॅनालायटिका घोटाळ्यात काँग्रेसचे देखील नाव घेतलं होतं हे विसरू नका.’
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत पोलिसांकडून कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या झाल्यावर मिनीयापोलिस या ठिकाणी मोठं आंदोलन सुरू झालं होतं.
त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक फेसबुक वर पोस्ट केली होती व त्यात आंदोलनकर्त्यांना ‘चोर’ असं म्हटलं होतं. तसंच लूटमार सुरू झाली तर त्यांना गोळ्या घाला असेदेखील त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. जगभरात या पोस्टवर आक्षेप घेतला गेला. मात्र फेसबुकनं ही पोस्ट डिलीट करण्यास नकार दिला.