चांद्रयान-2 ऑर्बिटरने चंद्राभोवती एक वर्ष पूर्ण केले असून पुढचे सात वर्ष पुरेल एवढा इंधनसाठा या ऑर्बिटरमध्ये असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. गुरुवारी 20 ऑगस्टला या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झालं आहे.
चांद्रयान 2 मोहिमेत ऑर्बिटर आणि रोवर यांचा समावेश होता. ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत राहून चंद्राच्या पृष्ठभागाचा आणि वातावरणाचा अभ्यास करेल आणि रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असा मोहिमेचा उद्देश होता.
22 जुलै 2019 ला चांद्रयान 2 चं यशस्वी उड्डाण झालं होतं. त्यानंतर 20 ऑगस्ट 2019 ला ऑर्बिटरने यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर रोव्हर चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र या प्रयत्नात अखेरच्या क्षणाला इस्रोला अपयश आलं.
तरीही चांद्रयान 2 मोहिमेचा महत्त्वाचा भाग असणारा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या फिरत आहे. या ऑर्बिटरमध्ये पुढची सात वर्षे पुरेल इतकं इंधन असल्याची माहिती इस्त्रोनं दिली आहे. या ऑर्बिटरवर चंद्राचा अभ्यास करण्यासाठी 8 उपकरणे लावली आहेत.
चांद्रयान 2 मोहीम पुढील सात वर्ष चालणार असल्याने चंद्राविषयी बरीच नवीन माहिती मिळेल अशी आशा इस्त्रोनं व्यक्त केली आहे. एका वर्षात या ऑर्बिटरने चंद्राभोवती 4400 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत.
या अगोदर भारताने 2008 मध्ये चांद्रयान-1 प्रक्षेपित केले होतं. या मोहिमेत चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे भारताला मिळाले होते.