पंजाबच्या बारावी बोर्डात दलित कुटुंबातील जसप्रीत कौर हीने ९९.५% मिळवले आहेत. जसप्रीत पंजाब राज्यामधून सर्वाधिक गुण मिळवणारी विद्यार्थिनी ठरली आहे. यासाठी जयप्रितला न्यूयॉर्कच्या एका संस्थेकडून एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आलय. यासोबत दिल्लीच्या अशोका यूनिवर्सिटी कडून देखील पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
पंजाब बोर्डमध्ये टॉप करणारी जसप्रीत ही एक दलित विद्यार्थिनी आहे. जसप्रीत ही पंजाब मधील मानसा जिल्ह्यातील बाजेगाव गावात राहते. तिचे वडील केस कापण्याचा व्यवसाय करतात. अश्या सर्वसामान्य कुटुबांत जन्मलेल्या जसप्रीतने पंजाब राज्यात पहीला क्रमांक पटकावलाय. यामुळे संपुर्ण देशभरातून जसप्रीतचं कौतुक होतंय.
द प्रिंटने जसप्रीतची बातमी केल्यानंतर, दिल्लीतील अशोका यूनिवर्सिटीने तिला शिष्यवृत्ती देणार असल्याचं जाहीर केलं. यात मोफत शिक्षणासोबत तिच्या राहण्याची आणि जेवणाची सोयदेखील यूनिवर्सिटी कडून करण्यात येणार आहे. पण यासाठी अगोदर जसप्रीतची एक परीक्षा घेण्यात येईल आणि या परिक्षेत ती पास झाली तरंच जेवण, हॉस्टेल, शिक्षण मोफत मिळणार असल्याचं यूनिवर्सिटी कडून सांगण्यात आलंय.
द प्रिंट ने केलेल्या स्टोरी मध्ये जयप्रीत सांगते की, “मी कधी पंजाबची राजधानी चंडीगढ़ पण पाहिलेली नाही. शेती, शाळा, घर या पलीकडे मी कधी गेलेलीच नाही. मला फक्त एक शिक्षिका बनायचे आहे.” पण जयप्रीत ज्या गावातून येते तिथे जातीय वर्चस्व, मुलींना शिकण्यास बंदी, भेदभाव अश्या अनेक समस्या आहेत. गावातील लोकांची दूषित विचारसरणी, घरातील आर्थिक प्रश्न, या सगळ्यांवर मात करत जसप्रीत इथं पर्यंत पोहचली आहे. पण दिल्लीतील खासगी विद्यापीठीत शिष्यवृत्तीमुळे तिचे प्रश्न संपणार आहेत का ?
अशोका यूनिवर्सिटी कडून जसप्रीतला शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे तिचा केवळ आर्थिक प्रश्न सुटेल पण, नव्याने येणाऱ्या अडचणींना तिला सामोरे जावे लागणार आहे. अशोका युनिवर्सिटी हे दिल्लीतील खासगी विद्यापीठ आहे. विद्यापीठात शिकणारे ९०% विद्यार्थी हे उच्च जातीतील आहेत तर इतर मागास वर्गातील(OBC) ५% आणि नॉन क्रिमीलियर OBC वर्गातील ५% विद्यार्थी शिक्षण घेतात. या सगळ्यात निराशाजनक बाब म्हणजे यूनिवर्सिटी मध्ये एक ही आदिवासी विद्यार्थी शिकत नाही.
पण अशोका विद्यापीठात सरकारमान्य राखीव जागा असताना देखील राखीव जागांवर प्रत्येक जातीचे विद्यार्था का भरलेले नाहीत ? अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय जातीतील आरक्षणानुसार विद्यार्थांच्या हक्काच्या जागा असताना अशोका विद्यापीठाने यातल्या कोणत्याच जागा भरलेल्या नाहीत. यामुळे विद्यार्थांना हक्काच्या जागा देण्यास नाकारणारे अशोका विद्यापीठ, दलित कुटुंबातील जसप्रीतला प्रवेश देऊन फक्त आपल्या संस्थेची प्रसिध्दी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे जयप्रीतला शिष्यवृत्ती देऊन अशोका विद्यापीठ आपली दुसरी बाजु झाकण्याचा प्रयत्न करत आहे. हे दिसुन येतंय.
शिष्यवृत्तीमुळे जसप्रीत सारख्या विद्यार्थांचे प्रश्न सुटणार आहेत का ? मागच्या काही वर्षात देशातील घटना पाहता दलित विद्यार्था जेव्हा मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी जातात तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. पायल तडवी, रोहित वैमुला, अशी अनेक उदाहरणे देशाने पाहीलेली आहेत. जे आपल्याला दलित विद्यार्थ्यां प्रश्नांचा विचार करायला लावते. यामुळे फक्त प्रवेश मिळवणे हा प्रश्न न उरत नाही तर तिथल्या व्यवस्थेत टिकून राहणे हे विद्यार्थांसाठी आव्हानात्मक असते. याबरोबर विद्यापीठाने जरी जसप्रीतला शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले असले तरी तिच्यासाठी विद्यापीठाने एक परिक्षा देण्याची अट ठेवलेली आहे. यामुळे आपल्या गावातून कधीच बाहेर न पडलेल्या जसप्रीत ही सगळी आव्हान पेलतील का, आणि ती स्वत:ला इथे टिकवू शकेल का ?