ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी हे जून महिन्यात केलेल्या दोन ट्विटमुळे अडचणीत आले आहेत. या ट्विटमुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झालाय या कारणाने त्यांना दोषी ठरवण्यात आलंय. याविषयी न्यायालयाने प्रशांत भुषण यांना फेरविचार करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला आहे, परंतु या प्रकरणामुळे आज लोकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलंय का ? असा प्रश्न देशभरात उभा राहतो आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर #Isupportprashantbhushan हा हॅशटश संपुर्ण देशभरातुन नागरिकांनी चालवला.
प्रशांत भूषण यांनी मागच्या काही वर्षात न्यायालयीन व्यवस्थेच्या झालेल्या अवस्थेबद्दल आणि सरन्यायाधीश शरद बोबडे यांना भाजप नेत्याची महागडी बाईक चालवताना हेल्मेट आणि मास्क लागत नाही का ? अशी दोन ट्विट केली होती. पण मागच्या काही दिवसातील विविध राजकीय नेत्यांची वादग्रस्त विधानं पाहता फक्त प्रशांत भूषण यांना दोषी ठरवणे, हा म्हणजे संविधानाने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी आहे. अश्या प्रतिक्रिया देशभरातुन येत आहेत. पण NEET-JEE परिक्षा प्रश्न आणि CAA आंदोलनात अटक केलेले लोका असे खटले रखडलेले असताना सर्वोच्च न्यायालयाला हाच खटला एवढा महत्वाचा का वाटावा? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
या खटल्यावर बोलताना न्यायमूर्ती अरुण मिश्रा म्हणाले की, “चूक करणार नाही अशी कोणतीच व्यक्ती जगात नाही. तुम्ही १००० गोष्टी चांगल्या केल्या असल्या, तरी तुम्हाला १० गोष्टी चुकीच्या करण्याची परवानगी मिळत नाही. तरीही तुम्ही केलेल्या चुकीमुळे तुमच्यात पश्चातापाची भावना निर्माण झाली पाहिजे” न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला ६ महीने कैद आणि २ हजार रुपयांपर्यंतचा दंड अशी शिक्षा होऊ शकते.
“सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी दोषी ठरल्याबाबत आपल्याला खूप वेदना झाल्या, शिक्षा होणार म्हणून नाही, तर आपल्या म्हणण्याचा गैरसमज करून घेतल्याबद्दल वेदना झाल्या.”, असं प्रशांत भूषण यांनी सांगितलं. न्यायालयाने यावर फेरविचार करण्याबद्दल सांगितल्यावर “जास्त विचार करून मला न्यायालयाचा वेळ घालवायचा नाही. ट्विट संस्थेच्या भल्यासाठीच होते. दिलगिरी व्यक्त करण्याबाबत मला काही मर्यादा आहेत. मी दयादेखील मागत नाही. न्यायालय देईल ती शिक्षा मला मान्य आहे.”, असं भूषण यांनी सांगितलंय
- तुषार धायगुडे