अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात आनुवंशिक बदल केलेले 75 कोटी मच्छर सोडण्याची परवानगी स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्थानिक भागातील मच्छरांची संख्या कमी करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. दक्षिण फ्लोरिडात मच्छरांचं जास्त प्रमाण असून शहरी भागांमध्ये हे अधिक प्रमाणात सापडतात. या मच्छरांनी कीटकनाशकांच्या विरोधात लढण्याची क्षमता विकसित केली आहे.
आनुवंशिक बदल केलेले मच्छर तयार करण्याचं काम मे महिन्यात ऑक्झिटेक या कंपनीला देण्यात आलं होतं. या कंपनीने नर जातीच्या एडीस एजिप्ती या मच्छरांमध्ये जनुकीय बदल केले होते. या कंपनीनं जनुकीय बदल केलेल्या मच्छरांना OX5034 असे नाव दिलं आहे.
नेमकी योजना काय आहे?
एडीस एजिप्ती या जातीचे मादी मच्छर हे डेंगू, चिकनगुनिया, पिवळा ताप, झिका यासारखे भयंकर हजार पसरवण्यासाठी जबाबदार असतात. या जातीचे फक्त मादी मच्छर माणसांना चावा घेतात. कारण अंडी तयार करण्यासाठी त्यांना रक्ताची गरज असते.
हे मादी मच्छर ठराविक काळानंतर अंडी बनवण्यासाठी सक्षम ठरतात. त्यानंतर ते रक्ताच्या शोधात माणसांचा चावा घेतात.
जेव्हा जनुकीय बदल केलेले नर मच्छर मादी मच्छरासोबत संभोग करतील, तेव्हा नर मच्छरात असलेले विशिष्ट प्रोटीन नवीन जन्मलेल्या मच्छरामध्ये येईल. या प्रोटीनमुळे मादी मच्छर चावण्यास सक्षम होण्याअगोदरच मरतील.
मच्छर सोडण्याच्या योजनेला विरोध
मात्र या योजनेवर अनेक लोकांनी टीका केली आहे. चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर दोन लाख 40 हजार लोकांनी पेटिशन साइन करून या योजनेला विरोध दर्शवला होता. तसेच एका पर्यावरण गटाने सांगितला आहे की जर जनुकीय बदल केलेले मच्छर फ्लोरिडात सोडले तर तेथील लोकांना, पर्यावरणाला आणि धोक्यात आलेल्या प्रजातींना अजून धोका वाढेल. मात्र ऑक्सिटेकच्या शास्त्रज्ञांनी असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेसोबत बोलताना सांगितले की आम्ही 100 कोटीपेक्षा जास्त मच्छर मागच्या वर्षी सोडले आहेत. यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही.
त्याचबरोबर कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ब्राझीलमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
आता हे मच्छर नेमकं काय करतात हे लवकरच समोर येईल.
- दिगंबर दगडे