22 ऑगस्टला जगभरात गणपतीचं आगमन झालं आहे. लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र कोरोना काळात गणपतीची सजावट करण्यासाठी अनेक जणांनी सजावटीसाठी वेगवेगळी शक्कल लढवली आहे. मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनीदेखील एकावर एक पुस्तक रचत गणपतीसाठी आरास केली होती. ‘पुस्तक बाप्पा’ अशी त्यांची संकल्पना होती. मात्र त्यांची हीच सजावट टीकेची धनी ठरली आहे.
अभिनेते प्रवीण तरडे यांनी भारताच्या संविधानावर गणपतीचा पाट ठेवून गणपती बसवण्याचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यानंतर तरडे यांच्या या कृतीचा फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून विरोध करण्यात आला.
आता प्रवीण तरडे यांनी एक व्हिडिओ तयार करून सगळ्यांची माफी मागितली आहे. तसंच अशी चूक पुन्हा होणार नाही याची देखील ग्वाही दिली आहे.
https://www.facebook.com/100000338537393/posts/3424585744229343/?app=fbl
व्हिडिओच्या शेवटी मात्र प्रवीण तरडे म्हणाले की मी भारतातीलच नव्हे तर जगभरातील दलित बांधवांची माफी मागतो. त्यामुळे भारताचे संविधान फक्त दलित बांधवांचंच आहे का असा प्रश्न देखील निर्माण होतो.
संविधानाच्या अपमानाच्या घटना वारंवार होत आहेत. मग लोकांनी विरोध केल्यावर माफी देखील मागितली जाते. मात्र संविधानाचा अपमान करण्याची चूक खरंच चूक असते की मुद्दाम केलं जातं या प्रश्नाचे उत्तर शोधणं गरजेचं आहे.
- दिगंबर दगडे