आऊ म्हणजेच सगुणाबाई खंडू शिरसागर या गोविंदराव फुल्यांच्या मानलेल्या भगिनी ! या हडपसरला राहत. त्यांच्या माहेरी व सासरी कोणीच जिवंत राहिले नव्हते. तेव्हा त्या पुण्यास जॉन नावाच्या गोऱ्या मिशनऱ्याची मुले सांभाळण्याचे काम करीत होत्या. सगुणाबाई मिशनऱ्यांच्या सहवासामुळे तोडके-मोडके इंग्रजी बोलत असत.
ज्योतिबाची आई चिमणाबाई या ज्योतीबांच्या बालपणीच वारल्या. 1829 पासून ज्योती रावांच्या संगोपनाची जबाबदारी सगुनाबाईंनीच घेतली. लग्नानंतर जोतिबांचे शिक्षण सुटले तेव्हा लिजिट साहेब गफार मुनशी यांच्या मार्फत गोविंदरावांचे मन वळवून जोतिबांचे शिक्षण पुन्हा सुरू करण्यात सगुणाबाई यांचा महत्त्वाचा वाटा होता.
पुढे ज्योतीबांच्या लग्नानंतर “तु जे काही शाळेत शिकतोस, ते सावित्रीला शिकवं, तुझ्या पुढील संसाराला सावित्रीचा हातभार लागेल” असे ज्योतिबांना सगुणाबाईंनी सांगितल्यावरून जोतिबांनी सावित्रीबाई व सगुणाबाई या दोन विद्यार्थिनींसह भारतातील पहिली बायांची शाळा सुरू केली. पुढे सगुनाबाईंनी सावित्रीबाईसोबत मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूल मधून शिक्षकी व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले होते.
सगुणाबाई यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना म. फुले “निर्मिकाचा शोध”. या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत म्हणतात, “तुम्ही मला नुसते जगविलेच नसून माणूस बनविले, दुसऱ्याच्या मुलावर प्रेम कसे करावे हे मी तुमच्यापासून शिकलो.” आपल्या लाडक्या आऊचे वर्णन करतांना सावित्रीबाई म्हणतात,
आमची आऊ | फार कष्टाळू
सागर वाटे | उथळ क्षणी
आऊ आमच्या | घरी आली
मूर्तिमंत जणु | विद्यादेवी
प्रेमळ होती | होती दयाळू
आभाळ ठेंगणे | तिच्याहूनी
टाक होऊन | पहा बैसली
हृदयी आम्ही | तिला साठवी
महाराष्ट्रावर असलेल्या तुर्क मोगलांच्या परकीय आणि जुलमी राजवटी विरोधात शेतकरी – दलित मावळ्यांची फौज उभारून माता जिजाबाईंच्या संस्कारात वाढलेल्या छत्रपती शिवराजांनी हिंदवी स्वराजाची स्थापना केली. खऱ्या अर्थान कष्टकरी जनतेचे , रयतेची मायेच्या प्रेमाने काळजी घेणारे , माय – भगिनी व स्त्रियांचा योग्य मान – सन्मान राखणारे पहिले राज्य छत्रपती शिवरायांनी स्थापन केले.या राज्याविषयी सावित्रीबाई आपल्या काव्यात म्हणतात –
अधर्मी पराज्यी तिथे राज मंत्री
अती शूद्र झाले स्वधर्मी कुपात्री
स्वधर्मी अती यातना शूद्र भोगी
असे पशूतुल्य जीणे अभागी
म्हणोनी शिवाजी स्वराज्या उभारी
समाजी अतीशूद्र लोकास तारी…
शिवाजी महाराजांच्या राजवटीचे महत्त्व सांगताना व कौतुक करतांना सावित्रीबाई वरील कवितेत परकीयांची राजसत्ता असतांना शूद्र व अतिशूद्रांना यातना सोसाव्या लागत. जनावरप्रमाणे जीवन जगावे लागे. म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून खालच्या जातीतल्या माणसांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून दिल्याचे सांगितले आहे.