सध्या पृथ्वीचे सरासरी तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. वातावरणात सोडण्यात येणारा कार्बन-डाय-ऑक्साइडचे वाढते प्रमाण याला जबाबदार आहे. इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट कंट्रोलच्या अहवालानुसार 2050 पर्यंत कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन शून्य झालं पाहिजे. त्याचबरोबर वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड काढून घेऊन त्याची साठवणूक करावी लागेल.
कार्बन डायऑक्साइड वातावरणातून काढून घेऊन त्याची साठवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर जगभरात केला जात आहे. मात्र एका संशोधनानुसार या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जगाच्या काही भागात खाद्य पदार्थांच्या किमती पाच पटींनी वाढतील.
सध्या वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड काढून टाकण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यात बायोएनर्जी विथ कार्बन कॅप्चर अँड स्टोरेज, डायरेक्ट एअर कॅप्चर अशा तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
बायो एनर्जी विथ कार्बन कॅप्चर अँड स्टोरेज या तंत्रज्ञानात कार्बन डाय ऑक्साईड जास्त प्रमाणात शोषून घेणाऱ्या पिकांची लागवड केली जाते. त्यानंतर विज तयार करण्यासाठी त्यांना जाळलं जातं. आणि त्या दरम्यान तयार होणारे कार्बन डाय ऑक्साईडला साठवून जमिनीत गाडले जातं.
अर्थातच या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन लागेल. त्यामुळे अन्नधान्य पिकवणाऱ्या जमिनीचे क्षेत्र कमी होईल आणि याचा अप्रत्यक्ष परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतीवर होऊ शकतो.
नेचर या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनात डायरेक्ट एअर कॅप्चर या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे थेट वातावरणातून कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतला जातो. या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि पाणी लागणार आहे. यामुळे जगभरातील लोकांच्या जीवनावर नेमका काय परिणाम होईल, याचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे.
सध्या जगात वीज निर्मितीसाठी जेवढं पाणी लागतं, त्याच्या 35 टक्के पाणी 2050 मध्ये डायरेक्ट एअर कॅप्चरसारख्या यंत्रांना लागेल. त्यामुळे अशा यंत्रांचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात केला गेला, तर गहू, मका यासारख्या पिकांची किंमत वाढेल. महत्त्वाचं म्हणजे याचा मोठा फटका आफ्रिकन देशांना मोठ्या प्रमाणात बसेल. 2050 पर्यंत या भागात खाद्य पदार्थांची किंमत पाचशे ते सहाशे टक्क्यांनी वाढेल.
युनिव्हर्सिटी ऑफ वर्जीनियाचे डॉक्टर अँड्रेस क्लारेन्स म्हणाले की हे संशोधन डायरेक्ट एअर कॅप्चरसारख्या तंत्रज्ञानाविरोधात नाही. उलट या प्रकारचे तंत्रज्ञान भविष्यात महत्त्वाची ठरणार आहेत. मात्र त्यामुळे जगभरातील लोकांच्या जीवनमानावर जे परिणाम होणार आहेत ते देखील लक्षात घेतले पाहिजेत.
त्याचबरोबर ते म्हणाले की जीवाश्म इंधनाचा वापर लवकरात लवकर थांबवण्याची गरज आहे. कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारी तंत्रज्ञान आहेत, म्हणून आपण कितीही इंधन जाळू शकतो असा विचार चुकीचा ठरेल.
डॉक्टर अँड्रेस क्लारेन्स यांनी संशोधनाचे नेतृत्व केलं आहे
- दिगंबर दगडे