महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचा विचार केला असता आजवर एक मोठी राजकिय ताकद म्हणून ही चळवळ स्थिरावली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत उभारलेली ही चळवळ आंबेडकरोत्तर कालखंडात खुपश्या प्रायोगिक तत्वांवर लढली गेली. भारतीय रिपब्लिकन पक्षातील गटतट, दलित पँथरचा झंझावात, बहुजन समाज पार्टीचा दृष्टीकोन, सम्यक समाज आंदोलन ते आजचा वंचित बहुजन आघाडीची भूमिका इ. अनेक संस्था,संघटना आणि पक्षांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्थानी ठेवून ह्या चळवळीला स्वतःचं अस्तित्व समजलं. परंतु, सत्ताकेंद्री आणि एकजातीय राजकारण, प्रस्थापित पक्षांच्या कुटनित्या, अंतर्गत मतभेद अशा अनेक कारणास्तव आंबेडकरी चळवळीची दशा झाली. रिपब्लिकन ऐक्य ही काँग्रेस धार्जिनी असल्याने ते ही प्रश्नचिन्ह बनूनचं आजवर चर्चेत आहे. तरी देखील आंबेडकरी चळवळ चढत्या -उतरत्या काळाला छेदत आपलं स्थान टिकवून आहे.
नुकतचं केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष मा. रामदास आठवले यांनी ‘रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही’ अस वक्तव्य प्रसार माध्यमांसमोर केल्यामुळे आजवर सत्ताकेंद्री राजकारणात करणारे रामदास आठवले प्रस्थापितांना आयत कोलीत देताय की काय? हा मोठा प्रश्न आहे. कोणती ही चळवळ काही काळ तकलादू झाली म्हणजे ती लयाला गेली असे नसते ही साधी गोष्ट मागे काँग्रेस सोबत राहून त्यांना आजच्या काँग्रेसच्या धीटपणाला बघत शिकता आली नाही की स्वतःच्या नैराश्याची ही भिती आहे हे समजणे गरजेचं आहे.तरी ही, रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांच्या मूल्यांना, विचारांना मानणारा पक्ष आहे आणि आजही आंबेडकरी समूह अथवा कार्यकर्ता स्वतःचं राजकीय मूल्य हे ‘रिपब्लिकन’ हे समजतो त्यामुळे रामदास आठवलेंचं हे वक्तव्य ‘जगबुडी झाली म्हणून ओरडणाऱ्या पाण्यात पडलेल्या कोल्ह्यासारखं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टी म्हणून उत्तर प्रदेशातुन आलेला पक्ष जातीची टक्केवारी सांगत आणि आंबेडकरी समूहावर टीका टिपण्णी करत टिकून आहे. त्याला स्वीकारणारा वर्ग आज ही सत्तास्थापनेच्या आशावादात आहे तसेच त्याचं प्रवाहातून अलिप्त होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरावू बघणारा एक वर्ग प्रस्थापितांशी लागेबांधे ठेवूनच आहे. उलटार्थी आंबेडकरी चळवळ यशस्वी करत समता प्रस्थापित करणाऱ्या मूल्यांवर विश्वास ठेवणारी ही कार्यकर्ते कोणता भोळा आशावाद घेऊन अजून ही राजकीय चळवळ म्हणून येथे आहे याचं आज ही आकलन झालेलं नाही.
महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील आजचे चर्चेने नावं म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल आंबेडकरी समूह आणि चळवळीतील एक मोठा वर्ग त्यांच्या प्रति आशावादी आहे. एकजातीय राजकारणातून अलिप्त असलेले प्रकाश आंबेडकर यांचा ‘बहुजनवाद’ आणि सोबत असलेले पुरोगामी प्रवाह हे चित्र अनेकांना विश्वासहार्य वाटतं आहे. तसेच काँग्रेस -राष्ट्रवादी या दांभिक सेक्युलर पक्षांबाबत ठाम भूमिका,आजवरचा धर्मांध शक्तींना केलेला विरोध,वैचारिक भूमिका आणि राजकिय दूरदृष्टीमुळे आणि लोकसभा व विधानसभेतील मिळवलेल्या मतांच्या ताकदीमुळे एक मोठा समूह त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे.
महाराष्ट्र तसा पुरोगामी असला तरी ही आजच्या परिस्थितीत त्यावर ओढावलेली धर्मांध शक्तींची भिती आणि सामाजिक -राजकीय चळवळीतल्या प्रबोधनामुळे झालेलं सर्वसामान्यांच्या आकलनामुळे अनेक प्रवाह हे आंबेडकरी चळवळीला येऊन मिळत आहे.आंबेडकरी चळवळ ही तिचं उपद्रव मूल्य सिद्ध करीत आहे.एकजातीय राजकारणातील संकुचित बुद्धी न बाळगता बहुजनवादी चळवळीच्या दृष्टीने विचार करून कार्यकर्ते सिद्ध होत आहे ही चळवळीने धारण केलेली योग्य दिशा भविष्याच्या दृष्टीने सकारात्मकतेकडे वाटचाल केलेली दिसत आहे.
महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा आजवरचा इतिहास आहे की, सामाजिक मूल्यांना विसरणाऱ्या नेत्यांना ही आंबेडकरी चळवळीने फारकती दिल्या आहे. आजवर सत्तास्थापन करण्याच्या कसरतीत किमान बाबासाहेबांनी दिलेली व्यवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ही व्यवस्था टिकवून तिला सुदृढ कसे करता येईल यासाठी कार्यकर्ते कटिबद्ध राहिले आहे. त्यामुळे, ऐक्य अबाधित व्हावे, प्रस्थापितांच्या दावणीला बांधून घेतलेल्या नेत्यांना सामावून सुवर्णमध्य साधावा इ. भ्रामक कल्पनांचं जूने तुणतुणे वाजविण्यापेक्षा ही बाबासाहेबांच्या चळवळीची प्रतारणा आहे हे लक्षात घेत स्वतंत्र आणि स्वाभिमानी चळवळीसोबत वाटचाल करीत सत्तास्थापन होईलं असं चित्र उभं करावं या जबाबदारीसह सिद्ध व्हायला हवं!
– संविधान गांगुर्डे