हैदराबाद येथील नीलकंठ भानू या मुलाने भारताला मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे. सतत अंकांविषयी विचार करणारा नीलकंठ जगातील सर्वात वेगवान मानवी कॅल्क्युलेटर बनला आहे. लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेली माईंड स्पोर्ट्स ओलंपियाड या स्पर्धेत त्याने ही कामगिरी बजावली आहे. नीलकंठच्या नावावर चार विश्वविक्रम असून पन्नास लिम्का विक्रम आहेत.
नीलकंठला लोकांच्या मनातली गणिताची भीती घालवायची आहे. बीबीसीला दिलेल्या खास मुलाखतीत नीलकंठ भानू यांनी आपले गणिताविषयीचे विचार मांडले. तो म्हणतो की एखाद्या स्पर्धेत भाग घेऊन विक्रम करणं हा माझा प्रमुख उद्देश नाही. तर गणितासारख्या विषयांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन गणिताचा प्रसार करणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.
नीलकंठ लहानपणापासून हुशार नव्हता
खरतर नीलकंठ भानू लहानपणापासून हुशार नव्हता. वयाच्या पाचव्या वर्षी त्याच्यासोबत एक अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्याच्या आई-वडिलांना सांगण्यात आलं होतं की मुलाच्या ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता कमजोर होईल.
त्यानंतर मेंदूला सतत चालना देण्यासाठी त्याने मेंटल कॅल्क्युलेशनचा सराव सुरू केला. दररोज सहा तास तो सराव करायचे.
‘बोलताना समोरच्याची पापणी किती वेळा फडफडते हे मी मोजतो’
त्यानंतर पुढे सरावाची पद्धत त्याने बदलली. संगीताचा सराव करताना तो लोकांसोबत बोलायचा, गप्पा मारायचा. त्यामुळे मेंदूला एकाच वेळी अनेक काम करण्याची क्षमता विकसित होते, असं त्यांचं म्हणणं आहे. नीलकंठ जेव्हा लोकांसोबत बोलतो तेव्हा त्यांच्या पापण्या किती वेळा फडफडतात याचा देखील विचार करत असतात. जरी आपल्याला ही गोष्ट वाचायला विचित्र वाटत असलं तरी मेंदूला सतत व्यस्त ठेवण्यासाठी तो असं करतात.
‘लाॅकडाऊनमध्ये दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला’
नीलकंठ म्हणतो की गणित विषय शिकणाऱ्या लोकांना सामाजिक भान नसतं, असं मानलं जातं. त्याच बरोबर त्यांना पुस्तकी किडा म्हणून संबोधलं जातं. मात्र गणितासारख्या मजेशीर विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे, असं मत त्याने व्यक्त केलं. मुलांच्या मनातील गणिताची भीती घालवण्यासाठी एक्स्प्लोरिंग इन्फिनिटी नावाचा प्रकल्प त्याने सुरू केला आहे. लाॅकडाऊनच्या काळात या प्रकल्पाच्या माध्यमातून तो दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला आहे.