इतिहास हा कायम पुढे जाणारा आणि विकसनशील असतो. येणारा पुढील काळ हा गुलामीच्या साखळ्या अधिक मोकळ्या करणारा असतो, असे काही विचारवंत मानतात. कार्ल मार्क्स या जर्मन विचारवंताच्या मते, इतिहास हा वर्तुळाकार गतीने पुढे जात असतो. काही वेळा तो पुढे जाण्यासाठी थोडा मागे येउन पुन्हा पुढे जातो. महाराष्ट्रात शिवशाहीनंतर आलेली पेशवाईची राजवट ही इतिहासाचे असेच मागे येणे होते. या राजवटीत स्त्रिया व अस्पृश्यांवरील अन्याय – अत्याचारात खूप वाढ झाली. पेशव्यांची ही राजवट तर एवढी स्त्रीविरोधी आणि अत्याचारी होती की, ‘गावात पेशव्यांची स्वारी येणार’ अशी खबर लागल्यावर आई-बाप आपल्या तरूण मुली-सुनांना पेशव्याच्या अत्याचाराच्या भीतीने धान्याच्या कणगीत लपवून ठेवत. तर काही महिलांनी पेशवा आपल्या गावात येतोय असे ऐकल्यावर आपल्या अब्रू रक्षणासाठी विहिरीत उड्या मारून आपली जीवनयात्रा संपवली.
या राजवटीविषयी सावित्रीबाई लिहितात –
तुला बोलवी रावबाजी धनी गं
स्वपलीस धाडी निर्लाजा पती गं
छळे ब्राह्मणाला अशी सैणशाही
मुखा बोलती ही जळो पेशवाई
या काव्यात सावित्रीबाईंनी उल्लेख केलेला रावबाजी हा शेवटचा पेशवा. हा खूप स्त्री – लंपट होता. रावबाजीच्या काळात स्त्रियांवर खूप अत्याचार झाले. हा रावबाजी त्याच्या नोकर – चाकरांना त्यांच्या बायकांना त्याच्याकडे पाठविण्याचा आदेश देत असे. हे नोकर चाकर आपली रोजी – रोटी टिकावी म्हणून आपल्या बायकांना रावबाजीकडे जाण्यास सांगत. आपला अन्नदाता अशा अर्थाने त्याचा धनी म्हणून यात उल्लेख केला आहे . घराची भाकर टिकावी म्हणून मनातून शिव्या – शाप देत या बायांना रावबाजीकडे जावे लागे. पुढे १८१८ साली ही पेशवाई बुडाली व बाळाजीपंत या ब्राह्मणाच्या हस्ते इंग्रजी राज्याचे निशान युनियन जॅक ‘ शनिवार वाड्यावर फडकला.
पेशवाईच्या काळात शिक्षण ही केवळ ब्राह्मणांचीच मक्तेदारी होती. तेली , माळी , कुणबी , मराठा या अठरापगड जातींनी शिक्षण घेतले तर त्यांच्या सात पिढ्या नरकात जातील . पुत्रप्राप्ती होणार नाही , स्त्रिया शिक्षणाने विधवा होतील. असे बरेच गैरसमज परंपरेने लोकांच्या मनात रुजवलेले होते व त्याला मनुस्मृती सारख्या धर्मशास्त्रांचा आधार देण्यात आला होता. मनुस्मृती ही धर्मशास्त्रिय राज्यघटना सांगते, “न स्त्री – शुद्राय मती दद्यान्नोच्छिष्टं न हविष्कृतम” म्हणजे स्त्रिया व शुद्रांना ज्ञान घेण्याचा व संपत्ती संचयाचा अधिकार नाही. त स्त्रिया व शुद्र जातीतील पुरुषांना शिक्षण – व्यवसायाची संधी नाकारणाऱ्या विषमतासमर्थक मनुस्मृतीच्या आदेशाप्रमाणे चालणाऱ्या राज्याचे वर्णन करताना सावित्रीबाई एका कवितेत म्हणतात,
मनू वर्ण कल्पी विषारी विकारी
अनाचार रूढी सदा बोचणारी
स्त्रिया शूद्र सारे गुलामी गुहेत
पशूसारखे राहती ते कुपात ||
या कवितेचा अर्थ मनूने ज्या चार वर्णामध्ये माणसांची विभागणी केली. जी शिक्षण -व्यवसाय इत्यादी बाबतची बंधने शूद्र जाती व सर्व वर्णातील स्त्रियांवर लादली. त्यामुळे जनावरापेक्षाही हीन – खालच्या दर्जाचे जीवन स्त्रिया व शूद्रांच्या वाटेला आले. पेशवाईच्या या काळात स्त्री शिक्षणावर कठोर बंदी आली होत. अधर्म नको, स्त्रिया कुमार्गास लागू नयेत म्हणून त्यांना शिक्षण नको, या समजूती बरोबरच, स्त्रिया शिकल्या तर त्या अल्पवयात विधवा होतील, ही भीतीही त्या वेळच्या समाजात रूढ होती. अशाही वातावरणात जर कोणी स्त्री शिकू लागलीच तर, “आमची अमर्यादा केलेली आम्हांस खपायची नाही” अशी समज घरातील मोठ्या माणसांकडून त्या शिक्षण घेऊ पाहणाऱ्या बाईला दिली जात होती व तीचे शिक्षण बंद केले जाई. बाया अक्षर शिकल्या की त्याच्या आळया होउन (किडे) पुरुषांच्या ताटात जातात, असा गैरसमज त्याकाळी होता.