असेच एकदा उन्हाळ्याचे दिवस होते . तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक विहिरीवर अनेक स्त्रिया पाणी भरत होत्या. काही पुरूष माणसं तेथेच आंघोळी करीत होते तर काही स्त्रिया कपडे धूत असल्याचे जोतिबांनी पाहिले. त्याच ठिकाणी थोड्या दूरवर उभे राहून काही उघडी-नागडी पोरं आणि काही फाटक्या तुटक्या कपड्यातील बाया माणसं हातात पाण्याची भांडी घेऊन “आम्हाला पाणी वाढा” अशी याचना करीत होता । मात्र तेथे पाणी भरणाऱ्या कुणालाही त्यांची दया येत नव्हती. कुणालाही त्यांच्याकडे पाहायला , लक्ष द्यायला वेळ नव्हता. विहीर सार्वजनिक असली तरी महार-मांग आदि अस्पृश्य जातीतील या माणसांना विहिरीवर आपल्या हातांनी पाणी भरण्यास परवानगी नव्हती. कारण धर्मात सांगितल्या प्रमाणे त्यांच्या स्पर्शानं ती विहिर बाटणार होती. नेमके त्याच वेळी जोतीबा वाट तुडवित आपल्या घराकडे चालले होते. पाण्याच्या बादल्याच्या बादल्या अंगावर घेणारे लोक अस्पृश्यांना साधे पिण्याचे पाणीही देत नाही, हे मानवतेला काळीमा फासणारे दृश्य त्यांनी पाहिले. उपदेशापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून सांगितलेल्या गोष्टी लोकांना पटकन समजतात, लवकर पटतात. या वचनावर त्यांचा विश्वास होता. युक्ती पेक्षा कृतीवर भर देणाऱ्या माणसाविषयी सावित्रीबाई एका कवितेत म्हणतात,
वाचे उच्चारी । तैसी क्रिया करी
तीच नरनारी । पूजनीय ।।
सेवा परमार्थ । पाळी व्रत सार्थ
होई कृतार्थ । तेच वंद्य ।।
सुख दुःख काही । स्वार्थपणा नाही .
परहित पाही । तोच थोर ।।
मानवाचे नाते । ओळखती जे ते
सावित्री वदते । तेच संत ।।
जोतीबांनी त्या सर्व बाया-बापड्यांना आपल्या स्वतःच्या घरी नेऊन आपला हौद अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी खुला केला. त्यांनी स्वतः एका मुलाच्या हातातील भांडे घेऊन त्या हौदात बुडवले. त्यांच्या या कृतीने जणू शतकानुशतकांची अस्पृश्यतेची रुढी जोतीबांनी आपल्या घरातील हौदात बुडवून टाकली.
याविषयी सावित्रीबाई लिहितात,
स्वत:च्या विहीरी महारास वाटा
मनुष्यत्व दावी तयाचा सुवाटा
दलीतास आदेश सब्दोध साचे
न भूतो चमत्कार जोती युगाचे ।।
याचा थोडक्यात अर्थ असा की स्वतःची विहिर महारांसाठी खुली करण्याचे भुतकाळात कधीच न झालेले कार्य , असा जणू चमत्कार जोतिबांनी केला. आपला घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करण्याच्या जोतीबाच्या निर्णयाने पुणे शहरात पुन्हा एकदा सावित्री – जोतीबा यांच्या विरोधाची लाट उसळली. सनातन्यांनी ‘ धर्म बुडाला – धर्म बुडाला ‘ म्हणून टाहो फोडला. पण जो सिंहावर आरूढ होऊन संचार करीत असतो, तो कोल्हेकुईला भीक घालीत नाही. आपला हौद अस्पृश्यांसाठी खुला करण्याच्या जोतीरावांच्या या निर्णयामागे सावित्रीबाई ठामपणे उभ्या होत्या.