कोरोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (Act of God) असून या वर्षी (2020-21) अर्थव्यवस्था डबघाईस आली असल्याचे म्हणत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) नुकसान भरपाई देण्यास केंद्र सरकार हतबल असल्याचे सांगितले.
कोरोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ असून या वर्षी (2020-21) अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
एप्रिल ते जुलै या चार महिन्यांची सरकारने जाहीर केलेले १.५ लाख कोटींची नुकसान भरपाई दिलेलीच नाही. राज्यांना दिल्या जाणाऱ्या जीएसटी नुकसान भरपाईचा प्रश्न सोडवण्यासाठी गुरुवारी जीएसटी परिषदेची बैठक पार पडली.
परंतु परिषदेच्या या बैठकीत कोरोनाची आपत्ती ही देवाची करणी असल्याचे वक्तव्य केल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन या चर्चेत आल्या आहेत. या बैठकीनंतर Act of God म्हणजेच देवाची करणी हे वक्तव्य गूगलवर सगळ्यात जास्त सर्च करण्यात आले. हा शब्द सर्वात जास्त महाराष्ट्रातून सर्च करण्यात आला आहे.
यानंतर Act of God हा ट्रेंड फेसबुक, ट्विटरवर चालवण्यात आला. महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, कर्नाटक, आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्ये ट्रेंड चालवण्यात अव्वल स्थानी होती. हे गुगलच्या आकडेवारीमधून समोर आलंय.
निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. यामुळे अनेकांनी केंद्र सरकार आता थेट देवाला आर्थिक परिस्थितीसाठी दोष देत असल्याची टीका केली आहे.
या सगळ्या घडलेल्या प्रकरणानंतर महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी २०१८ साली केलेल्या ‘भारताचे पंतप्रधान परम आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी हे श्री विष्णु चे अकरावे अवतार आहेत” या ट्विटने पुन्हा तोंड वर काढलंय.
या ट्विटचा संदर्भ देत मोदींना अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीसाठी जबाबदार धरावे का असा प्रश्न नेटकऱ्यानी उपस्थित केलाय.