तरंगणारा पूल ऐकून जरा आश्चर्यच वाटतंय ना? हो, पण असा पूल अस्तित्वात आहे आणि जगातला सगळ्यात मोठा पूल म्हणूनही ओळखला जातो. म्हणजे २०१६ पर्यंत तो फक्त मोठा पूल होता, परंतु २०१६ मध्ये नव्यानं त्याला उभारल्यानंतर मात्र तो जगातला सर्वात लांब आणि जगातला सगळ्यात जास्त रुंद म्हणूनही ओळखला जाऊ लागला. याचं नाव गिनीज बुकमध्येही नोंदलं गेलंय. तर या पूलाच नाव आहे ‘एव्हरग्रीन पॉइंट फ्लोटिंग ब्रीज’, अमेरिकेतील सिएटल वॉशिग्टन येथे हा पुल आहे. आणि हा पूल २८ ऑगस्ट म्हणजे आजच्याच दिवशी १९६३ मध्ये वाहतुकीसाठी चालू झाला होता.
७,५७८ फूट एवढ्या लांबीचा हा पूल ३३ पाँटून बोटीच्या साहाय्याने बांधला होता. ज्याचा खर्च २४.७ मिलियन डॉलर एवढा आला होता, परंतु तरीही एवढा जास्त विश्वसनीय नव्हता; कारण हा पूल भूकंपरोधक तंत्र येण्याआधी बांधला होता. त्यामुळं त्यासाठी असणारी उपाययोजना तिथं नव्हती. त्याला पोकळ आधार होता, त्यामुळं जोराचं वादळ आलं, की पूल बंद करायला भाग पडायचं. या पुलाची वयोमर्यादाही होत आली होती, मग २ एप्रिल २०१६ रोजी हा पूल बंद करण्यात आला आणि याच महिन्यात नवीन, परंतु याच नावाने बनवण्यात आलेला एव्हरग्रीन ब्रीज चालू करण्यात आला.
नवीन तयार केलेला पूल हा मात्र अद्ययावत आहे. भूकंप, वादळ, वारा या सर्व गोष्टींचा विचार करून हा पूल बांधण्यात आला आहे. त्यामुळं आता प्रवासी सुरक्षितपणे यावरून प्रवास करू शकतात. जुन्या पूलापेक्षा नवीन पुलाची लांबी १३० फुटांनी वाढवण्यात आली आणि त्याचबरोबर हा पूल जगातला सगळ्यात मोठा लांबीचा आणि रुंदीचा पूल ठरला.
नवीन पुलासाठी ७७ काँक्रिट पोंटून बोटींचा वापर केला गेला आहे. या बोटींना ३ इंच जाड साखळीनं बांधून तळाशी नांगराच्या साहाय्याने रोवलेलं असतं, अशाप्रकारे हा पूल पाण्यावर तरंगू शकतो.
हा पूल पूर्ण करण्यासाठी ४.५ बिलियन डॉलर एवढा खर्च आला आहे. हा खर्च पाहून आश्चर्य वाटत असेल परंतु या पुलावरून दिवसाला साधारण ७४,००० एवढी वाहनं प्रवास करतात आणि या पुलाच आयुर्मान ७५ वर्ष आहे त्यामुळं एवढा खर्च होणं साहजिकच आहे.