सावित्रीबाई फुले यांच्या शाळेतील मातंग समाजातील एक विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिने पेशवाईच्या त्या काळातील परिस्थितीचे वर्णन आपल्या एका निबंधात केले आहे. त्यात ती म्हणते , ‘ आम्हा गरीब मांग महारास हाकुन देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले , व त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वश करण्याचा क्रम चालविला होता. आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानले आहे. सांगते ऐका , ज्या वेळी बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानीत होते की काय ? पहा बरे, तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे; त्याचा धनी तुमची फटफजीती करून तरी राहील की काय ? परंतु मांगमहारांस मारू नका असे म्हणणारा कोण होता बरे ?
त्यासमयी मांग अथवा महार यांतून कोणी तालीमखान्या पुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरुन जाण्याची बंदी; तर मग विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार ? कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महारमांग असून वाचतात तर ब्राह्मणांनी का त्यांस दप्तराचे काम देऊन त्यांच्या ऐवजी धोकट्या बगलेत मारून विधवांच्या हजामती करीत फिरावे की काय ? असे बोलून तो त्यांस शिक्षा करी.
इंग्रजांनी जेव्हा स्त्रिया व मागासवर्गियांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काही मदत करण्याची किंवा त्यांच्यासाठी शाळा उघडण्याची भूमिका घेतली तेव्हा शिक्षण ही आमची धार्मिक बाब आहे, तेव्हा इंग्रज सरकारने अशा धार्मिक बाबतीत लक्ष घालू नये , असा शिक्षणाची मक्तेदारी असलेल्या भट-ब्राह्मणांनी कांगावा सुरू केला. तेव्हा इंग्रजांनीही आपल्या राज्यकारभारात उगीच कटकट नको म्हणून, त्यातून माघार घेतली.
त्याकाळी सर्व जातीतील स्त्रिया व ब्राह्मण वगळता इतर जातीतील पुरुषांना शिक्षण घेण्यास बंदी होती. ‘ ज्ञान घेणे हा फक्त ब्राह्मणांचाच ( फक्त ब्राह्मण पुरुषांचा ) अधिकार आहे, असा ब्राह्मणांसह उच्चजातीयांचा समज होता. ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी महाराष्ट्रात उच्चवर्णियांकडे विद्येची मक्तेदारी होती. अन्य जातीतील लोकांनी शिक्षण घेतल्यास ब्राह्मणांच्या जन्मजात वर्चस्वास हादरा बसेल आणि आपल्या लिखापढीच्या व्यवसायात स्पर्धा निर्माण होईल , अशी भीती त्यांना वाटत होती. म्हणून खालच्या जातीतील लोकांच्या शिक्षणाला हे लोक उघडपणे विरोध करीत.