‘ब्लॅक पँथर’ चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करणाऱ्या चॅडविक बोसमनचं वयाच्या 43 व्या वर्षी निधन झालं. 2016 पासून आताड्याच्या कर्करोगाशी चाललेली बोसमन यांची झुंज शुक्रवारी (29 ऑगस्ट) थांबली.
बोसमन यांना 2016 मध्ये स्टेज 3 आतड्याच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांचा कॅन्सर सोबतचा लढा 2020 पर्यंत चालला. विशेष म्हणजे या चार वर्षात कॅन्सरवर उपचार घेत असताना देखील अनेक चित्रपटांचे शूटिंग बोसमन यांनी पूर्ण केलं.
बोसमन यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबाकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. ‘चॅडविक बोसमन हे खरे लढवय्या होते. त्यांनी लोकांसाठी अनेक चित्रपट केले. तसेच चाहत्यांचं भरपूर प्रेम मिळालं. चॅडविक यांनी कॅन्सरसंबंधीची शस्त्रक्रिया आणि केमोथेरेपीचे उपचार घेत असताना देखील मार्शल, द फाईव्ह ब्लड्स, ब्लॅक बॉटम या सारख्या अनेक चित्रपटांचं शूटिंग पूर्ण केलं’, असं देखील पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं.
लॉस एंजेलिस येथे कुटुंबाच्या सहवासातच ब्लॅक पँथरच्या भूमिकेने अजरामर झालेल्या चॅडविक बोसमन यांनी अखेरचा श्वास घेतला.