सावित्रीबाईंबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल सहानभूती वाटणाऱ्या त्यांच्या काही मैत्रिणींना सावित्रीबाईंचा होणारा छळ पाहवत नव्हता. पण उघडपणे सावित्रीबाईंना पाठिंबा देण्याची हिम्मतही त्यांना होत नव्हती अशा काही मैत्रिणींनी सावित्रीबाईंना, “जोतिबा पुरुष आहे, त्याना ते काम करु दे तू मात्र मुलींच्या व अस्पृश्यांच्या शाळेतील शिकवणे बंद करावे” असेे सुचविले. तेव्हा सावित्रीबाई त्यांना उत्तर देतात, “जे लोक माझ्या अंगावर दगड, शेणगोळे, उष्टे खरकटे पाणी टाकतात ते अज्ञानी आहेत. त्यांना या कार्याचे महत्त्व कळत नाही त्याची या अज्ञानापासून मुक्ती व्हावी त्यांना सत्य कळावे, म्हणून तर मी विद्यादानाचे काम करते. त्यांच्या या अज्ञानमूलक कृतीचा अर्थ मी वेगळा घेते. त्यांचे दगड, शेणगोळे, निंदानालस्तीचे शब्द यांचा वर्षाव माझ्यावरील फुलांचा वर्षाव मी मानते. “माझ्या कामात ते मला उत्तेजनच देतात, असे मी मानते”
समाजातील ज्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी सावित्रीबाई प्रयत्न करीत होत्या, त्याच जाती-समाजातील लोक त्यांना त्रास देत होते. समाजातील या अज्ञानाचे वर्णन करतांना सावित्रीबाई म्हणतात;
एकच शत्रू असे आपला
काढू पिटुन मिळुनि तयाला
त्याच्याशिवाय शत्रूच नाही
शोधूनि काढ़ा मनात पाही
शोधला का ?
पाहिला का ?
विचार करूनी सांग लेकरा ,
नाव तयाचे बोल भरभरा
हरलास का ?
कबूलब का ?
सांगते पहा दुष्ट शत्रुचे
नाव नीट रे ऐक तयाचे
“अज्ञान ”
धरूनि त्याला पिटायाचे
आपल्यामधुनि हुसकायाचे
कितीही त्रास झाला आणि कोणतेही संकट आले तरी “अज्ञान” नावाच्या आपल्या या शत्रूला हाकलायचेच असा निर्धार सावित्रीबाई या कवितेत व्यक्त करतात.
सावित्री व जोतीबा कोणत्याही उपायांना बधत नाही व आपली शाळा बंद करीत नाही असे पाहून पुण्यातील कर्मठ ब्राह्मणांनी सावित्री जोतीबा विरोधात जसे इतरांचे कान भरले, तसे जोतीबाचे वडिल गोविंदराव फुले यांचेही कान भरले. तुमचा मुलगा धर्मद्रोह करतो आहे. तुमचा वंश बुडेल इत्यादी. तेव्हा गोविंदरावानी सावित्री-जोतीबाला शाळा बंद करण्याचे फर्मान काढले.
मात्र “मुलींना व शुद्रांना शाळा शिकवण्यात आपण कोणतीही चूक करीत नसून शिक्षण घेणे हा सर्व मनुष्य जातीचा नैसर्गिक अधिकार आहे. तेव्हा मी शाळा बंद करणार नाही” ‘असे जोतीबांनी आपल्या वडिलांना सांगितले. तेव्हा “शाळेत शिकवणं तरी सोड, नाही तर घर तरी सोड” असा निर्वाणीचा इशारा गोविंदराव फुले यांनी आपल्या मुलाला व सुनेला दिला. तेव्हा निरक्षर व पिडलेल्या आपल्या हजारो बांधवाच कुटुंब शिकून सवरुन ज्ञानी व्हावं यासाठी सावित्रीबाई व जोतीबाने अंगावरच्या कपड्यानिशी आपलं घर सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे स्वातंत्र्य चळवळ व वर्ग जात मुक्तीच्या लढ्यातील हजारो कार्यकर्त्यांनी चळवळीसाठी आपले कुटुंब त्यागल्याची उदाहरणे आहेत. समाज कार्यासाठी आपले घर सोडणारे सावित्री आणि जोतीबा हे देशातल पहिल दाम्पत्य आहे.