आज डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येला ५ वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही कोर्टात याबाबतीत ठोस निकाल लागू शकलेला नाही. याआधी गोविंद पानसरे आणि डॉ दाभोळकर यांची देखील अश्याच तऱ्हेने हत्या करण्यात आली होती.
कलबुर्गी याचं पूर्ण नाव मलेशाप्पा मादिवलाप्पा कलबुर्गी. त्यांचा जन्म २८ नोव्हेंबर १९३८ या दिवशी कर्नाटक राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील सिंदगी या गावी झाला होता. त्यांचा मृत्यू ३० ऑगस्ट २०१५ या दिवशी कर्नाटक मधीलाच धारवाड इथं झाला. त्यांच्या राहत्या घरी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
१९६२ मध्ये त्यांनी कन्नड भाषेतून पदव्युत्तर होऊन गोल्ड मेडल मिळवलं होतं. त्यानंतर १९६६ मध्ये तिथंच ते प्रोफेसर म्हणून पदव्युत्तर विभागासाठी रुजू झाले. १९६६ मध्ये ते विभागप्रमुख झाले. निवृत्त होण्याच्या काही वर्ष आधी त्यांनी कुलगुरू म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडली. २००६ साली त्यांना कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं होतं.
कलबुर्गी हे संशोधनासाठी लंडन, केंब्रिज तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठात देखील गेले होते. कर्नाटक सरकारकडून प्रदर्शित होणाऱ्या ‘समग्र वाचना संपुता’ याचेदेखील ते मुख्य संपादक होते. त्यांनी विविध विषयावर १०३ पुस्तकं आणि ४०० पेक्षा जास्त लेख लिहिले होते.
अनिष्ट रूढी, परंपरा या गोष्टींना त्यांनी तर्कवादाने विरोध केला होता. त्यांचा मूर्तिपूजा, जातीप्रथा, मंदिरं अशा गोष्टींना देखील विरोध होता. अशा गोष्टींमुळे हिंदू संघटनांना त्यांच्याकडून धोका वाटतं होता. त्यामुळं त्यांच्यावर विविध धार्मिक संघटनांचा रोष होता. त्यांना अनेक धमकीचे ई- मेल्स आणि पत्रंदेखील येत होती.
त्यातूनच २०१५ साली त्यांच्या घरी दोन अज्ञातांनी येऊन त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. कलबुर्गी जरी गेले असले तरी त्यांच्या विचारांची ठिणगी मात्र अजूनही तशीच आहे. पण ५ वर्ष होऊन देखील त्यांच्या मारकऱ्यांचा शोध लाग शकलेला नाही.