सप्टेंबर महिन्यात जेईई आणि नीट परीक्षांचे आयोजन करण्यात आलं आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या परीक्षांचे आयोजन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या संतापाचं वातावरण आहे. गेल्या दोन महिन्यांपासून फेसबुक, ट्विटर सारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली बाजू मोदी सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
आता देशभरातील विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी युट्युबचा आधार घेतला आहे. 30 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित करण्यात आला. या व्हिडिओला आतापर्यंत 17 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे 4 लाख 84 हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला नापसंती दर्शवली आहे.
देशातून जेईई आणि नीट परीक्षा रद्द कराव्यात किंवा पुढे ढकलाव्यात अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र या परीक्षा रद्द केल्या, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं वर्ष वाया जाईल. तसेच त्यांचं करिअर धोक्यात येईल असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं होतं.
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार
त्याचबरोबर यूजीसीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 30 सप्टेंबरपर्यंत घेण्यात यावी, असं पत्र काढलं होतं. याविरोधात देखील देशभरातील वेगवेगळ्या विद्यापीठातील 31 जणांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द कराव्यात किंवा पुढे ढकलण्यात, अन्यथा सरासरी गुण द्यावेत असं याचिकांमध्ये म्हटलं होतं. मात्र परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात पण परीक्षा न देता विद्यार्थ्यांना बढती देणे योग्य नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना जर कोरोनाची लागण झाली तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का? असा प्रश्न देशभरातील विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या काळात जेईई-मेन परीक्षा होणार असून 13 सप्टेंबर ला नीट परीक्षा होणार आहे.