आजकालच्या धावपळीच्या जीवनात सर्वांनाच सगळी कामं अगदी लवकर लवकर करायची असतात आणि यातूनच अनेक यंत्रांचा जन्म झाला आहे. एटीएमचा जन्मही असाच झाला. कितीतरी वेळ रांगेत थांबून पैसे काढणं, खात्यातील शिल्लक तपासणे या वेळखाऊ आणि कंटाळवाण्या कामामुळे एटीएमचा शोध लागला.
पण तुम्हाला माहीत आहे का? अमेरिकेसारख्या मोठ्या देशात पहिलं एटीएम केव्हा बसवलं गेलं? आपण जरी एटीएमशी अगदी अलिकडेच परिचित झालो असलो तरी हे वाचून आपण थोडं चकित होऊ शकतो की युएसएमध्ये हे एटीएम मशीन १९६० दशकाच्या शेवटीच आलं होत. २ सप्टेंबर १९६९ रोजी पहीलं एटीएम मशीन बसवण्यात आलं होतं.
न्यूयॉर्कमधल्या केमिकल बँक, रॉकविल सेंटर इथं सर्वात आधी एटीएम बसवण्यात आलं होतं. ही खरं तर क्रांतीच होती, यामुळं लोकांची बँकेत जायची बहुतेक गरज संपली. पण गंमतीची गोष्ट ही पण होती की १९६९ मध्ये एटीएम मध्ये फक्त पैसे काढण्याची सोय होती, खात्यातील शिल्लक बघता येत नव्हती. शिल्लक पाहण्याची सोय ही नंतर दोन वर्षांनी १९७१ मध्ये चालू झाली.
एवढं असूनपण एटीएम हे सुरुवातीला एवढं लोकप्रिय नव्हतं तर ते ८० च्या दशकात विशेष लोकप्रिय झालं. २००५ च्या एका अहवालानुसार अमेरिकेत १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सुमारे १७० दशलक्ष लोकांकडे एटीएम कार्ड होते आणि त्याचा उपयोग सरासरी महिन्यातून ६-८ वेळा केला जायचा.