गुरुवारी सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वैयक्तिक ट्विटर हँडल आणि वेबसाइट हॅक करण्यात आलं आहे. हॅक करण्यात आलेल्या ट्विटर अकाऊंटवरून काही ट्विट्स करण्यात आले होते. या ट्विटमध्ये कोरोनासाठी बनवलेल्या पीएम केअर रिलीफ फंडात बिटकॉईन जमा कराव्यात, असं आवाहन करण्यात आलं होतं. ट्विटरने या बातमीला दुजोरा दिला असून अकाऊंट सुरक्षित ठेवण्याचे सगळे उपाय केले असल्याची माहिती दिली.
हॅकरने या ट्विटमध्ये त्याचं नाव ‘जॉन विक’ असं सांगितलं आहे. त्याचबरोबर तीन दिवसांपूर्वी पेटीएम माॅल हॅक झाल्याची बातमी आली होती. पण पेटीएम माॅल हॅक करण्याचं काम आम्ही केलं नाही असं देखील या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तसेच या हॅकरने अजून काही ट्विट करत कोविड-१९ साठी तयार करण्यात आलेल्या पीएम केअर रिलीफ फंडासाठी बिटकॉईन्स डोनेशन करण्याचं आवाहन केलं होतं.
मात्र ट्विटरकडून हे ट्विट्स डिलिट करण्यात आली आहेत. देशात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असताना देशाच्या पंतप्रधानांचं अकाऊंटचं हॅक होणं ही चिंतेची बाब आहे.
विशेष म्हणजे हॅकर ज्या हॉलीवूड अभिनेत्याचं नाव वापरतो, त्या जॉन विकचे पात्र करणाऱ्या कियानू रिव्सचा बुधवारी वाढदिवस होता.
बिटकॉईन्स हा व्हर्च्युअल चलनाचा भाग असून २००९ मध्ये हे सुरू झालं होतं.