सावित्री-जोतीबा घराबाहेर पडल्यानंतर त्यांचा मुस्लिम समाजातील मित्र उस्मान शेख याने त्यांना आपल्या राहत्या घरातील जागा व संसारोपयोगी भांडी-कुंडी आदि वस्तू दिल्या. सावित्रीबाई व जोतीबांना गोविंदरावांनी घराबाहेर काढल्यानंतरही हे दोघे पती-पत्नी शाळेचे कार्य उत्साहाने करीत होते.
पण या शाळांमध्ये येणारे विद्यार्थी खूप गरीब परिस्थितीतून आलेले होते. त्यामुळे शाळेची फी देण्याची त्याची ऐपत नव्हती. तेव्हा हितचिंतकांनी दिलेल्या मदतीवरच या शाळा चालत. त्यात एकतर या विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तक द्यावी लागत. क्वचित काही विद्याथ्यांना कपडेही द्यावी लागत. पण आता सावित्री जोतीबाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने ही शाळा त्यांना बंद करावी लागली. आणि भारतातील मुलीची पहिली शाळा बंद पडली तेव्हा जोतीब्याचे मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीला होते.
यापूर्वी गोवंडे यांच्या सोबतच जोतिबा एके दिवशी मिस फरार याची नगर येथील मुलींची शाळा पहावयास गेले होते. त्यावेळी ही शाळा पाहिल्यानंतरच मुलींची पुण्यात शाळा काढण्याचा आपला बेत त्यांनी नक्की केला होता.
सावित्री-जोतीबाला वडिलांनी घराबाहेर काढल्यावर गोवंडे पुण्यास आले व त्यांनी सावित्रीबाईना नगरला नेले. सावित्रीबाई नगरहून परतल्यानंतर केशव शिवराम भवाळकर या जोतीबाच्या दुसऱ्या मित्राने सावित्रीबाईंना पुढील शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर सावित्रीबाई सोबत शाळांमधून शिकविण्यास उपयोगी होतील अशा काही तरुण स्त्री शिक्षिकांचा वर्ग घेण्याचे ठरले. भवाळकरानी बरीच खटपट करुन पुण्यात स्त्रिया जमवून त्यांना शिक्षण दिले. याच शाळेत उस्मान शेख याची बहिण फातिमा शेख हिनेही शिकवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. आपले बंद पडलेले ज्ञानदानाचे कार्य पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्याचा ध्यास फुले दाम्पत्याने घेतला होता.
त्यावेळी शाळेसाठी कुणी जागा देईना, नवी शाळा बांधावी तर त्याकरीता जवळ पैसा नव्हता. लोक आपली मुले शाळेत पाठवायला तयार होत नव्हती. पण सावित्री जोतीबांनी स्त्री शिक्षणाचा ‘घेतला वसा टाकणार नाही’ असा निर्धारच केला होता. या निर्धाराला आता समाजातील वेगवेगळ्या जाती धर्मातील स्त्री – पुरुषांची साथ मिळू लागली होती.
ती सन १८५१ सालातील गोष्ट. आपली बंद पडलेली शाळा नव्या जोमाने सुरु करण्याची तयारी सावित्री जोतीबा करीत होते त्यावेळी लहूजी मांग – राणबा महार हे आपापल्या जातवाल्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत व त्यांनी आपल्या मुलींना शाळेत पाठवावे याकरीता त्यांना राजी करीत. तर जोतीबाचे ब्राह्मण समाजातील सहकारी व मित्र भिडे, गोवंडे, परांजपे, भवाळकर, वाळवेकर तसेच मुस्लिम समाजातील मुनशी गफार बेग व एक इग्रज अधिकारी लिजिट साहेब हे शाळेसाठी जागा मिळविणे, आर्थिक सहाय्य इत्यादी प्रकारची मदत करीत होते.
यावेळी नव्याने शाळा सुरु करताना सावित्रीबाईना फातिमा शेख या मुस्लिम समाजातील सहकारी शिक्षिकेचीही सोबत होती. फातिमा शेख या १९ व्या शतकातील भारतातील पहिल्या मुस्लिम स्त्रीशिक्षिका होत्या. सन १८५१-५२ या शैक्षणिक वर्षात सावित्री – जोतीबांनी पुण्यात मुलींच्या तीन शाळा सुरु केल्या. यातील पहिली शाळा ३ जुलै १८५१ रोजी अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात सुरु करण्यात आली. या शाळेत पहिल्या दिवशी आठ मुली आल्या होत्या.
लवकरचया शाळेतील पटावर मुलींची संख्या ४८ पर्यंत पोहचली. या ४८ मुलींना शिकवण्याचे काम सावित्रीबाईसह ४ शिक्षक करीत असत. सावित्रीबाई या शाळेच्या मुख्य शिक्षिका होत्या. इतर शिक्षकांना संस्थेच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे थोडा – फार पगार दिला जात असे. सावित्रीबाई तेथे विनावेतन ज्ञानदानाचे काम करीत होत्या.
दुसरी शाळा १७ नोव्हेंबर १८५१ रोजी रास्ता पेठेत तर तिसरी शाळा १५ मार्च १८५२ रोजी वेताळ पेठेत सुरु करण्यात आली. दुसऱ्या शाळेत ५१ तर तिसऱ्या शाळेत ३३ मुली शिकत होत्या. या पाच – सहा वर्षाच्या काळात सावित्रीबाई आणि जोतीबांनी मुलींसाठी तीन आणि महारमांग आदि अस्पृश्यांच्या मुलामुलींसाठी तीन अशा एकूण सहा शाळा स्थापन केल्या..सावित्रीबाई व जोतीबांनी १८४८ ते १८५२ या चार वर्षात पुणे व सातारा जिल्ह्यात एकूण १८ शाळा सुरू केल्या त्यानी मुलीच्या शिक्षणासाठी ‘ “नेटिव्ह फिमेल स्कूल्स – पुणे” ही आणि महार मांग अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी ‘ दि सोसायटी फॉर प्रमोटींग दी एज्युकेशन ऑफ महारस् अँण्ड माग्ज अँण्ड एक्सेट्राज ‘ अशा दोन शिक्षण संस्थाची स्थापना केली होती.
त्यावेळचे शाळा अधिक्षक श्री . दादोबा पांडुरंग यांनी १६ ऑक्टोबर १८५१ रोजी सावित्रीबाईंच्या शाळेला भेट देऊन शाळेतील मुलीची परीक्षा घेतली. तेव्हा शाळा सुरु होऊन फारच थोडा काळ जाऊनही मुलीची शैक्षणिक प्रगती लक्षणीय असल्याचा अभिप्राय त्यांनी या शाळेविषयी नोंदविला आहे. शाळा नियमितपणे सुरु रहावी , शिक्षण कार्य अखंड पणे चालू रहावे व मुला – मुलींनी नियमितपणे शाळेत यावे याकरीता सावित्रीबाई स्वत : पालकांच्या भेटी घेत , त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत. ज्ञानाचे महत्त्व वर्णन करताना सावित्रीबाई एका कवितेत म्हणतात;
विद्या हे धन आहे रे । श्रेष्ठ साऱ्या धनाहून ।।
तिचा साठा जयापाशी । ज्ञानी तो मानती जन ।।
शाळा न शिकल्याने काय नुकसान झाले हे जोतीबा फुल्यांनी एका अखंडात सांगितले आहे, ते म्हणतात
विद्येविना मती गेलो , मती विना निती गेली
नीतीविना गती गेली , गती विना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले
तर विद्या न घेण्याचे तोटे वर्णन करताना सावित्रीबाई लिहितात;
विद्यविन गेले । वाया गेले पशू
स्वस्थ नका बसू । विद्या घेणे ।।
मुलांना शाळेत रुची वाटावी , त्यांना शाळेत यावे वाटावे म्हणून सावित्रीबाई वर्गात मुलाना खाऊ वाटत , त्यांना बाहेर खेळायला नेत. व त्यांच्या हुशारीबद्दल त्यांना बक्षिसेही देत असत. पण एवढे करूनही बऱ्याचदा गरीब पालकांना मुलाच्या शिक्षणापेक्षा त्याचे काम, जनावरांना चारावयास घेऊन जाणे , शेतावर छोटे-मोठे काम करुन दोन पैसे कमवून आणणे अधिक महत्त्वाचे वाटे व त्यामुळे मुल शिक्षण सोडून कामावर जात.
मुलांच्या शाळेतील गळतीचा हा प्रश्न सोडविण्यासाठी मुलांनी रोज शाळेत यावे यासाठी सावित्रीबाईनी उपस्थिती भत्ता देण्याची योजना सुरु केली व शाळेतील गळतीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. सन १८५६ ते १८५८ या दोन वर्षाचा महारमांग यांच्या शाळेसाठीचा जमाखर्च फुल्यांच्या शाळेचे खजिनदार सखाराम यशवंत यांनी जाहीर केला होता . त्याप्रमाणे शाळेचा एकूण खर्च दोन हजार एकशे चाळीस रुपयांपैकी १२८ रु . हे उपस्थिती भत्ता यावर तर ८२ रुपये मुलांच्या बक्षिसासाठी खर्च केल्याचे त्यात नमूद केलेले आहे.