गेल्या काही दिवसात बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा अजून जास्त प्रसार होऊ नये म्हणून सात सप्टेंबरपासून बारामती शहर व तालुका 14 दिवस बंद करण्यात येणार आहे. या लॉकडाऊन दरम्यान बारामती शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात येणार असून फक्त वैद्यकीय सेवा आणि दूध वाहतूक सुरू राहणार आहे.
तसेच या कालावधीत कोणालाही शहरांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. शुक्रवारी (४ सप्टेंबर) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी या संदर्भात माहिती दिली.
पत्रकार परिषदेत सात सप्टेंबरपासून 14 दिवसांच्या कालावधीत फक्त वैद्यकीय सेवा आणि दूध व्यवसाय सुरू राहणार असल्याचं सांगितलं. तसेच या कालावधीत वाहतूक सेवाही बंद करण्यात येणार आहे. यात एसटीचा देखील समावेश असणार आहे.
बुधवारी 2 सप्टेंबरला सकाळ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार बारामतीत 24 तासात 110 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. प्रशासनाने लोकांना सांगूनही सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर या नियमांचं पालन होताना दिसत नाही. ‘गरज असेल तरच बाहेर पडा’, असे प्रशासनाने आवाहन केलं असून देखील लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. या पार्श्वभूमीवर 7 सप्टेंबर पासून बारामतीत चौदा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.