दर ७५ वर्षांनी पृथ्वीला भेट देणाऱ्या धुमकेतूबद्दल कधी ऐकलं आहे का? ‘हॅले धुमकेतू’ असं या धुमकेतूचं नाव असून या धूमकेतूने १९८६ मध्ये पृथ्वीला शेवटची भेट दिली होती. आता हा धुमकेतू २०६१ मध्ये येणार आहे. पण नेमकं या धूमकेतूला कोणी शोधलं, हे माहीत आहे का? या लेखातून आपण अशाच अवलियाची कहाणी जाणून घेणार आहे.
हॅले धूमकेतूचा शोध घेणारा अवलिया म्हणजे ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ ‘एडमंड हॅले’. त्याने जरी धूमकेतूचा शोध लावला असला तरी तो फक्त खगोलशास्त्रज्ञ नव्हता. हॅले हा अवकाश संशोधक, भूगर्भशास्त्रज्ञ, गणिततज्ञ, हवामानशास्त्रज्ञ, भूभौतिकशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञही होता. (Edmond Halley)
एडमंड हॅलेचं शिक्षण
एडमंड हॅलेचं शिक्षण सें.पॉल्स स्कूल, लंडन इथं आणि नंतर द क्वीन्स कॉलेज, ऑक्सफर्ड इथं झालं होतं. हॅलेला सुरुवातीपासूनच घरचं वातावरण वैज्ञानिक आणि प्रगत होतं. त्यानं याचा चांगला वापरदेखील करून घेतला होता. क्वीन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर हॅलेची जॉन फ्लॅमस्टीड यांच्याशी पत्राद्वारे ओळख झाली होती. तिथं फ्लॅमस्टीडनं अनेक काम आणि संशोधन करून ठेवलं होतं. तिथं खगोलशास्त्रासाठी प्रोत्साहन दिलं जात होतं. (Edmond Halley Education)
त्यातूनच नंतर फ्लॅमस्टीडच्या दुर्बिणीचा वापर करून उत्तरेकडील ताऱ्यांच्या नोंदी त्यानं संकलित केल्या आणि त्यानंतर हॅलेनी दक्षिणेकडेपण असंच करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यासाठी राजा चार्ल्स आणि त्याच्या वडिलांनीही हॅलेला मदत केली. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीशी ओळख करून तो नोव्हेंबर १७७६ मध्ये अतिदक्षिणेकडील सें. हेलेना बेटाकडे जहाजाने निघाला. हा प्रदेश ब्रिटिश अधिपत्याखाली होता.
३४१ ताऱ्यांच्या अक्षांश आणि रेखांशच्या नोंदी
तिकडच्या खराब वातावरणामुळे मात्र त्याची निराशा झाली. तरीही या पठ्ठ्याने माघारी येताना ३४१ ताऱ्यांच्या अक्षांश आणि रेखांशच्या नोंदी घेतल्या होत्या. तसंच बुध ग्रहाची सूर्याभोवती असणाऱ्या प्रदक्षिणेबद्दल १६७८ मध्ये त्यानं प्रकाशित केलं होतं.
त्यानंतर त्याला खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळख मिळाली. १६७८ मध्ये त्याची निवड रॉयल सोसायटीचा सहकारी म्हणून झाली आणि राजा चार्ल्सच्या मध्यस्थीने त्याची अपूर्ण राहिलेली MA ची पदवीही भेटली.
हॅले आणि न्यूटनची भेट
१६८४ मध्ये हॅले आणि न्यूटनची भेट केंब्रिजमध्ये झाली. न्यूटनच्या गुरुत्वार्षणाच्या शोधाचा तो महत्वाचा भाग होता. हॅलेकडे जास्त असणारी गोष्ट कमी आणि अर्थपूर्ण शब्दात मांडण्याची क्षमता होती. वाऱ्याची दिशा दाखवणारा हवामानशास्त्राचा पहिला नकाशाही त्यानं प्रसिद्ध केला होता.त्याच्या १७०५ मधल्या ‘धूमकेतूंचं खगोलशास्त्र’ यामधून १३३७ ते १६९८ या काळात निरीक्षण केल्या गेलेल्या २४ धूमकेतूंच्या ‘पॅराबोलिक कक्षा’ही त्यानं प्रसिद्ध केल्या होत्या.
हॅले धूमकेतूचा शोध लागला
हॅलेनी हेही दाखवून दिलं होतं की १५३१, १६०७ आणि १६८२ साली पाहण्यात आलेल्या ऐतिहासिक धुमकेतूंमध्ये समान वैशिष्ट्यं होती. ते ठराविक वेळेनंतर दिसत असावेत आणि पुढे त्यानंतर १७५८ मध्ये धूमकेतू दिसण्याचा अंदाज हॅलेनी बांधला होता. विशेष म्हणजे हा अंदाज खरा ठरला. दुर्दैवाने हे पाहण्यासाठी हॅले आता जिवंत नव्हता. त्याच्या स्मरणार्थ या धुमकेतूला ‘हॅले’ नाव देण्यात आले.