सावित्रीबाई व जोतीरावांनी शाळा सुरु करून खुपच थोडा काळ झाला होता . मात्र शाळातील व्यवस्था व शिक्षणाची सोय यामुळे या शाळातील मुलींची शैक्षणिक प्रगती खूपच लक्षणीय होती. त्यामुळे संपूर्ण पुणे शहर व आजूबाजूच्या खेड्यांमध्ये या शाळांचा याच बोलबाला झाला होता.
सावित्रीबाईच्या शाळेस भेट दिलेले त्यावेळचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नामदार जॉन वॉईन सावित्रीबाईच्या शाळेचे एका जाहीर कार्यक्रमात कौतुक करताना म्हणाले होते की , ” जेव्हा मी प्रथम १८५१ मध्ये पुण्यात न्यायालयाचा आयुक्त म्हणून गेलो त्यावेळी तेथील मुलींच्या शाळांना मी भेट दिली. युरोपिय देशात ज्यूच्या भीतीमुळे वरच्या मजल्याचे दरवाजे बंद करून ख्रिचन लोकांच्या सुरुवातीच्या शाळा तेथे चालत त्याची आठवण मला तिथे झाली. त्या शाळेची शिक्षिका एका माळ्याची पत्नी होती. आपल्या देशबांधवाचे केविलवाणे अज्ञान दूर करून त्यांचा उद्धार करण्यासाठी स्वत:च्या पत्नीने साहाय्यभूत व्हावे म्हणून त्याने तिला शिकविले होते”
या मुलींच्या शाळांची पहिली वार्षिक परीक्षा १७ फेब्रुवारी १८५२ व दुसरी वार्षिक परीक्षा १२ फेब्रुवारी १८५३ रोजी पूना कॉलेजमध्ये झाली. त्याकाळी मुलीनी शिकणे आणि परीक्षा देणे हा पुण्यात मोठ्या कुतूहलाचा विषय होता. २३७ मुलींनी दुसरी वार्षिक परीक्षा दिली त्यावेळी ही परीक्षा बघायला पूना कॉलेजच्या आवारात तीन हजाराहून अधिक लोक जमले होते तर त्याहुनही अधिक गर्दी बाहेर जमलेली होती. या शाळांच्या परीक्षा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडल्या. मुलींनी दिलेली प्रश्नांची उत्तरे ऐकून लोक खुश झाले त्यावेळी मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात बोलताना जज्ज ब्रोन साहेब म्हणाले होते की, “आजचा हा जो प्रसंग मी हा ठिकाणी प्रथम पाहिला, त्यावरुन माझी खात्री होते की, ह्या देशातील लोक काहीतरी विचार करून स्वदेश सुखी करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. हे पाहून मला अतिशय संतोष होत आहे.
“सावित्रीबाई व जोतीबांनी सुरु केलेल्या शाळांची प्रगती खूप वेगाने होत होती. उच्चवर्णीय ब्राह्मण वगैरे मुलांसाठी त्याकाळी सरकारी शाळा होत्या त्या सरकारी शाळेत शिकणाऱ्या एका मुलाने २९ मे १८५२ रोजी “पूना ऑब्झरव्हर” या वर्तमानपत्रात लिहीले होते की, “जोतीरावांच्या शाळांतील मुलींची पटसंख्या सरकारी शाळातील मुलांपेक्षा दहापटीने मोठी आहे. त्याचे कारण मुलींना शिकवण्याची जी व्यवस्था त्या शाळांमध्ये आहे ती मुलांच्या शासकीय शाळातील व्यवस्थेपेक्षा अनेक पटीनी श्रेष्ठ दर्जाची आहे. जर अशीच परिस्थिती चालू राहिली तर, जोतीरावांच्या शाळेतील मुली सरकारी शाळातील मुलांपेक्षा वरचढ ठरतील व खरोखरोच येत्या परीक्षेमध्ये आपण मोठा विजय मिळवू असे त्यांना वाटत आहे. जर शासकीय शिक्षण मंडळाने यावर काही उपाययोजना केली नाही तर स्त्रियांनी पुरुषावर मात केली हे पाहून आम्हा पुरुषांना लाजेने माना खाली घालाव्या लागतील”
अदृश्य-महारांग यांचे साठी सावित्री-जोतीबा यांनी सुरू केलेल्या संस्थेच्या तीन शाळा होत्या. या शाळांमध्ये २५८ विद्यार्थी शिकत होते. या शाळांची संख्या वाढवावी असा सावित्री-जोतीबांचा मानस होता. मात्र अपुऱ्या निधीमुळे, आहे त्या शाळाही बंद करण्याची वेळ संस्थेवर आली होती. याबाबत संस्थेच्यावतीने सरकारला पाठविलेल्या पत्रात संस्थेचे कार्यवाह म्हणतात, “ मंडळाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षकांना मोठे वेतन देता येत नाही म्हणून शिक्षक जेथे अधिक पगार मिळतो तिकडे जातात. मधूनमधून असे शिक्षक शाळा सोडून गेल्यामुळे शाळेचे नुकसान होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई ह्यानी स्त्री शिक्षणाच्या सुधारणेसाठी उदारपणे जीवीत समर्पित करण्याचे ठरविले आहे. ह्या बाई आपले काम विनावेतन करतात. जसजसा ज्ञानाचा प्रसार होईल तसतसा स्त्रियांना शिक्षणापासून कोणता फायदा आहे हे लोकांना कळून येईल अशी आम्हाला उमेद वाटते” आज समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाबाबत दिसणारी जागृती पाहून तेव्हाच्या संस्थाचालकांनी-फुल्यांच्या सहकाऱ्यांनी बाळगलेली उमेद काही अंशी का होईना आज पूर्ण झाल्यासारखी वाटते. महारमांग आणि मुलींच्या या शाळांव्यतिरिक्त सावित्री आणि जोतीबांनी प्रौढ स्त्रीपुरुषांना शिकवण्यासाठी एक रात्रीची शाळा काढली होती. ती शाळा त्यांच्या राहत्या घरातच भरत असे. सावित्रीबाई व जोतीबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व पुण्यासारख्या सनातनी शहरात मुली व महारमांग अस्पृश्य तसेच प्रौढांसाठी काढलेल्या शाळा ही खूप मोलाची कामगिरी होती. त्यांच्या या कार्याची नोंद त्याकाळातील वर्तमानपत्रांनी घेतली होती.