संभाजी बिडीवरचं ‘संभाजी’ नाव बदलण्यात यावं यासाठी बारामतील शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या नारायणपेठ गावात हे उपोषण सुरु आहे. मात्र ४ दिवस उलटूनही अद्याप प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. या दरम्यान उपोषणकर्त्या दोन सदस्यांची तब्येत खालावली आहे.
महाराष्ट्रात १९७५ सालापासून संभाजी बिडीची विक्री सुरू आहे. आधी या बिडीचं नाव ‘शिवाजी बिडी’ असं होत. मात्र १९७५ साली या विरोधात आंदोलन केल्यावर या बिडीचं नाव बदलून ‘संभाजी बिडी’ ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे श्रद्धास्थान आहेत. यामुळे या बिडीवरचं संभाजी महाराजांचं नाव लवकरात लवकर हटवावे. जोपर्यंत हे नाव बदलणार नाही, तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही, असा पवित्रा शिवधर्म फाउंडेशनच्या सदस्यांनी घेतला आहे.
शिवधर्म फाउंडेशनने सुरु केलेल्या ह्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे. या उपोषणात शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक काटे, मच्छिंद्र टिंगरे, सुनिल पालवे,रवी पडवळ, सागर पोमण, आणि दिनेश ढगे हे सदस्य सहभागी आहेत.
दरम्यान, उपोषणाला चार दिवस उलटूनही प्रशासन का लक्ष देत नाही, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातून विचारला जात आहे.