कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लवकरात लवकर व माफक दरात कोरोना चाचणी होण्याची गरज लक्षात घेता, ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा दर १२०० रुपये एवढा कमी केला आहे.
यापूर्वी कोरोना चाचणीसाठी महाराष्ट्रात ४५०० रुपये प्रतिचाचणी दर लागत होता. हा दर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जूनमध्ये एका समिती स्थापना केली होती.
या समितीने त्यावेळी कोरोना चाचणी करणाऱ्या खासगी प्रयोगशाळांच्या मालकांबरोबर चर्चा करून ‘आरटीपीसीआर’ करोना चाचणीचे दर ४५०० हजार रुपयांवरून २२०० रुपयांपर्यंत कमी केले होते. गेल्या महिन्यात टास्क फोर्सच्या डॉक्टरांसोबत बैठकीत जास्त चाचण्या करण्याचा तसेच चाचणी दर आणखी कमी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आग्रह धरला होता.
त्यानंतर डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक समिती नेमण्यात आली. आणि ७ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाने आदेश जारी करून खासगी चाचणी केंद्रावर जाऊन कोरोना चाचणी करणाऱ्या रुग्णांसाठी १२०० रुपये दर जाहीर केला आहे.
जास्त चाचण्या व कमीतकमी वेळात चाचणीचा निकाल आल्यास करोना रुग्णांवर वेळेत व प्रभावी उपचार करणे शक्य झाल्यास कोरोनवर लवकर नियंत्रण मिळू शकते.