चंद्राच्या ध्रुवीय भागात गंज आढळून आल्याचं संशोधन अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने केलं आहे. चांद्रयान-1 या मोहिमेअंतर्गत मिळालेल्या डेटाचं विश्लेषण करत असताना संशोधकांना चंद्राच्या ध्रुवीय भागात गंज आढळला आहे.
या डेटाचं विश्लेषण केल्यानंतर चंद्राच्या ध्रुवीय भागात हेमेटाइट नावाचा घटक आढळला आहे. जेव्हा लोखंडाची प्रतिक्रिया पाणी आणि ऑक्सिजनसोबत होते, तेव्हा हेमेटाइटची निर्मिती होते.
अर्थातच त्यासाठी पाणी आणि ऑक्सिजन गरजेचं असतं. मात्र चंद्रावर ऑक्सिजन नाही. त्यामुळे हेमेटाईटच्या निर्मितीसाठी लागणारा ऑक्सिजन चंद्रावर नेमका कसा आला हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
2008 मध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-1 ऑर्बिटरकडून मिळालेल्या डेटाचा आधार घेतला जात आहे. याच चांद्रयान-1 ऑर्बिटरने चंद्रावर बर्फ आणि पाणी असल्याचा शोध लावला होता.
या मोहिमेदरम्यान नासाने देखील चांद्रयान-1 ऑर्बिटरसोबत मून मिनेरालॉजी मॅपिंग इन्स्ट्रुमेंट किंवा M3 साधन पाठवलं होतं. या उपकरणाकडून मिळालेल्या डेटाच्या आधारावर शास्त्रज्ञांनी चंद्राचे ध्रुवीय भाग गंजत असल्याचे पुरावे शोधले आहेत.
हेमेटाईट निर्मितीसाठी लागणारा ऑक्सिजन चंद्रावर नेमका कसा आला हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचे काम चालू आहे. मात्र शास्त्रज्ञांनी यासाठी दोन अंदाज मांडले आहेत.
करोड वर्षांपूर्वी चंद्र पृथ्वीच्या जवळ होता. दरवर्षी काही ठराविक अंतराने चंद्र पृथ्वी पासून लांब जात आहे. जेव्हा चंद्र पृथ्वीच्याजवळ होता, तेव्हा पृथ्वीवरचा ऑक्सिजन चंद्रावर गेला असेल.
त्याचबरोबर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे देखील पृथ्वीवरचा ऑक्सिजन 3 लाख 85 हजार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चंद्रावर जाऊ शकतो.
‘सायन्स ऍडव्हान्सेस’ यामध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 2021 च्या सुरवातीला भारताकडून चांद्रयान-3 प्रक्षेपित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 2024 मध्ये नासाकडून 50 वर्षानंतर चंद्रावर अंतराळवीर पाठवले जाणार आहे. त्यामुळे चंद्रावर ऑक्सिजन कसा आला? प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे.