१८८१ च्या खानेसुमारी ( जनगणने ) नुसार भारतात एकोणीस वर्षाच्या आतील बालविधवांची संख्या तेव्हा ६ लाख ६९ हजारांपेक्षा जास्त होती. ज्या वयात लग्न आणि संसाराची सुरेख स्वप्ने पहावित अशा वयात लाखो मुलीच्या कपाळी विधवेचे जिणे येत असे.१८९१ च्या शिरगणतीनुसार ४ वर्षे आतील वयाच्या विधवा झालेल्या बालिकाची संख्या तेव्हा १४ हजार एवढी होती. ज्या वयात आईच्या अगाखांद्यावर खेळावे, स्तनपान करावे अशा वयात या मुलींच्या कपाळी वैधव्याचा शिक्का बसे. अशा वेळी तिचे वय लक्षात घेता त्या तारूण्यसुलभ भावनांच्या आहारी जाऊन किंवा शेजारी पाजारी कुणी फसविल्यावर किंवा घरातल्याच कुण्या पुरूषाने केलेल्या जबरी बलात्काराला बळी पडून , जर ती गर्भवती राहिली तर विधवेने मूल जन्माला घातले म्हणून जी जननिंदा होईल, समाजात बदनामी होईल व आपले जिने हैराण होईल, या भितीने गरोदर राहिलेल्या या विधवा नदी – नाला – विहिरीत जीव देउन आपली व होणाऱ्या बाळाची जीवनयात्रा अर्धवट सोडून जगाचा निरोप घेत असत.
अशा गर्भवती राहिलेल्या विधवांनी आत्महत्या केल्याच्या घटना वारंवार घडत मात्र त्याची फारशी चर्चा त्याकाळात होत नसे. अशा या विधवांच्या होणाऱ्या आत्महत्या व बालकांच्या हत्याविरोधात सावित्री – जोतीबांनी एक कृतिशील पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांची मिळकत ( कमाई ) फारशी नव्हती. खरेतर त्यावेळी त्यांचे स्वतचेच खाण्यापिण्याचे हाल होते. काशीबाईच्या घटनेनंतर त्यांनी तात्काळ आपल्या स्वत:च्या राहत्या घरी ३९५ , गंज पेठ , पुणे येथे ब्राह्मण विधवांसाठी गुप्तपणे येऊन बाळंत होण्यासाठी आणि आपली मुले तेथे ठेवण्यासाठी आश्रम – बालहत्या प्रतिबंधक गृह -स्थापन केले. या बालहत्या प्रतिबंधक गृहाची माहिती देणारी भितीपत्रके ( पोस्टर ) त्यांनी पुणे शहरभर व विविध तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी लावली. ‘काळेपाणी टाळण्याचा उपाय’ अशा शिर्षकाने त्यांनी काढलेल्या या भितीपत्रकात फुले म्हणतात , “विधवांनो, इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपले मूल न्ह्यावे किंवा इथे ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील. त्या मूलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल” या आश्रमात येणाऱ्या विधवांची बाळंतपणे सावित्रीबाई स्वत: करीत व या माय – लेकरांची त्या आईच्या मायेने काळजी घेत.
१८६३ ते १८८४ या २० वर्षाच्या काळात राज्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्या फसवल्या गेलेल्या नाडलेल्या ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणं सावित्रीबाईंनी केली.
याविषयी सावित्रीबाई लिहतात….
पथा चूकल्या कामिनी पोटुशीना ।
प्रसूतीगृही सोय मोलाचि नाना ।।
सईणी , दवा पाणी , खाणे पिणेही ।
व्यवस्था अशी सर्व सावित्री पाही ।।
शिशु आश्रमी पाळणे हालविती ।
अशा दिव्य कार्यात तल्लीन जोती ।।
या काव्याचा थोडक्यात अर्थ असा – वाट चुकलेल्या गरोदर राहिलेल्या या सुंदर युवतीच्या बाळंतपण वगैरेची सोय येथे आहे. त्याची बाळंतपण, औषध, खाणे – पिणे ही व्यवस्था सावित्री करते तर लहान मुलांना सांभाळणे, त्यांना झोपवणे – पाळणा देणे अशी कामे तल्लीन होऊन जोतीबा करतात.
१८७४ साली अशीच एक अडलेली काशीबाई गरोदर राहिली म्हणून नदीवर जीव द्यायला निघाली होती. जोतीबांनी तिला आधार दिला. तिला घेऊन ते आपल्या घरी आले. सावित्रीबाईंनी तिचं बाळंतपण केले व तिचा मुलगा त्यांनी स्वत: दत्तक घेतला. त्याचे यशवंत असे नाव ठेवले. पुढे त्याला वैद्यकीय शिक्षण देऊन डॉक्टर बनवले. बालहत्या प्रतिबंधक गृह चालविणे ही त्याच काळातीलच नव्हे तर आजच्या काळाचा विचार केला तरी एक विलक्षण अशी गोष्ट आहे. त्याच गृहातील एक मूल स्वत: दत्तक घेणं ही सावित्री – जोतीबांच्या जीवनातील विचारासारखं वागण्याचं अत्यंत महत्त्वाच पाऊल आहे.