कालपासून सोशल मीडियावर पैशाचं गाठोडे डोक्यावर घेऊन असलेल्या व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. ४ एकरात कोथिंबीरीचं १२ लाख उत्पन्न कमावल्याबद्दल नेटकऱ्यांनी या व्यक्तीचा फोटो शेअर करत कौतुक केलं आहे.
मात्र हा फोटो खऱ्या कोथिंबीर उत्पादकाचा नाही असं निष्पन्न झालं आहे. विनायक हेमाडे यांनी यावर स्पष्टीकरण देत, ‘तो फोटो आपला किंवा आमच्या घरातील कोणत्याच सदस्याचा नाही’ असं सांगितलं आहे.
विनायक हेमाडे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील शेतकरी आहेत. त्यांनी कोरोना काळात घेतलेल्या कोथिंबिरीच्या पिकाला तब्बल १२ लाख ५१ हजार रुपये एवढे उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे सोशल मीडियावर ते खूपच चर्चेत आले होते.
कुणीतरी हेमाडे यांच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा फोटो टाकल्यामुळे, तोच फोटो व्हायरल झाला. त्यामुळे हेमाडे यांना अनेकजणांनी फोन करून चौकशी केली, त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला असल्याचं ते म्हणाले.
सोशल मीडियामुळे जग जवळ आलं असलं, तरीही पडताळणी न करता फॉरवर्ड केलेल्या गोष्टीचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत, हे या घटनेवरून समजत आहे.