पेट्रोल पंपावर गेल्यावर ‘या ठिकाणी मोबाईल वापरण्यावर बंदी आहे’, अशा सूचना असतात. मात्र कधी विचार केला आहे का की पेट्रोल पंपावर मोबाईल न वापरण्याचं कारण काय असेल? या लेखाच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल.
मोबाईल आणि टॉवर यांच्यामध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा वापर केला जातो. या लहरींची ऊर्जा जास्त असते. जेव्हा आपण पेट्रोल पंपाजवळ मोबाईल वापरतो, तेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींमुळे पेट्रोल पंपावर आग लागू शकते, असं मानलं जातं.
मात्र याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्याचबरोबर एखाद्या पेट्रोल पंपावर जर आग लागली, तर ती मोबाईलच्या वापरामुळे लागली आहे, असे कोणतेही ठोस पुरावे अजून मिळाले नाहीत.
बॅटरी खराब असेल तर धोका जास्त असतो
जर तुमच्या मोबाईलची बॅटरी खराब झालेली असेल किंवा फुगलेली असेल, तर बॅटरीचाच स्फोट होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशावेळी जर तुम्ही पेट्रोल पंपाजवळ असाल आणि बॅटरीचा स्फोट झाला, तर मात्र धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. थोडक्यात पेट्रोल पंपाजवळ मोबाईल न वापरलेलाच बरा!
पेट्रोल पंपावर सिगारेट ओढू नये
जेव्हा गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरत असताना त्याच्या वाफा तुम्ही नक्कीच पाहिल्या असतील. पेट्रोल आणि डिझेल ही ज्वलनशील पदार्थ असून कमी तापमानाला त्यांची वाफ होते. त्यामुळे पेट्रोल भरत असताना जर तुम्ही सिगारेटचा वापर करत असाल, तर मात्र आग लागण्याचा धोका वाढतो.