शिवप्रेमींच्या प्रयत्नांना अखेर यश आलं असून पुण्यातील साबळे वाघिरे आणि कंपनीने ‘संभाजी बिडी’ या बिडीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपासून शिवप्रेमींकडून संभाजी बिडीचं नाव बदलण्यात यावं, यासाठी उपोषण चालू होतं.
संभाजी बिडीच्या माध्यमातून संभाजी महाराजांविषयी वेगळा संदेश समाजात जात होता. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होत असल्याची भूमिका शिवप्रेमींनी घेतली होते. त्यामुळे लोकांची तीव्र भावना लक्षात घेत कंपनीनं संभाजी बिडीचं नाव बदलत असल्याचं पत्रकच जाहीर केलं आहे.
बारामतीतील शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषण सुरू होतं. यादरम्यान दोन शिवप्रेमींची तब्येतदेखील खालावली होती. पोलिसांनी या आंदोलनातील सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले देखील होते.
त्याचबरोबर संभाजी बिडीचं नाव बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील मागणी केली होती. त्याचबरोबर नितेश राणे यांनी देखील रोहित पवार यांच्या भूमिकेला समर्थन देत संभाजी बिडीवरचं नाव बदलावं अशी मागणी केली होती.
त्यानंतर वेगवेगळ्या संघटना आणि जनतेचे मत विचारात घेऊन साबळे वाघिरे आणि कंपनीने संभाजी बिडीचं नाव बदलणार असल्याची घोषणा केली. मात्र कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागेल असे देखील सांगितलं आहे.
काय आहे कंपनीची भूमिका
संभाजी बिडी या उत्पादनावर चाळीस ते पन्नास हजार लोकांचा संसार अवलंबून आहे. त्यात महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जर या बिडीचं नाव लगेच बदललं तर कंपनीला फटका बसेल आणि लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येतील, असे देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात १९७५ सालापासून संभाजी बिडीची विक्री सुरू आहे. आधी या बिडीचं नाव ‘शिवाजी बिडी’ असं होत. मात्र १९७५ साली या विरोधात आंदोलन केल्यावर या बिडीचं नाव बदलून ‘संभाजी बिडी’ ठेवण्यात आले होते.
या बिडीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आणि फोटो वापरण्यात येतं होता. मात्र 2011 मध्ये शिवप्रेमींच्या मागणीनंतर कंपनीने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि छत्रपती हे नाव काढून टाकलं होतं.
यावेळीदेखील कंपनीनं शिवप्रेमींची संभाजी हे नाव काढून टाकण्याची मागणी मान्य केली असून लवकरच या बिडीवरून हे नाव हटवण्यात येईल.