कोरोना विषाणू्च्या पार्श्वभूमीवर जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असल्यामुळे शाळा, महाविद्यालय, व्यवसाय सगळे काही बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होण्यासाठी सरकारकडून ऑनलाइन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात जोर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
‘फेअर शेअर फॉर चिल्ड्रेन- प्रिव्हेंटिंग द लॉस ऑफ ए जनरेशन टू कोविड-19’ या अहवालात इंटरनेट सेवा नसल्याकारणाने सुमारे ४० कोटी मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून आले आहे. तर शाळा बंद असल्याने एक अब्जहून अधिक मुले शिक्षणापासून सध्या वंचित आहेत.
कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन’ या संस्थेतर्फे ‘लॉरियेट्स अँड लीडर्स फॉर चिल्ड्रेन समिट’ ही दोन दिवसांची डिजीटल शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत ‘फेअर शेअर फॉर चिल्ड्रेन- प्रिव्हेंटिंग द लॉस ऑफ ए जनरेशन टू कोविड-19’ हा अहवाल बुधवारी सादर करण्यात आला.
ज्यात जगभरात इंटरनेटअभावी ४० कोटीहून अधिक मुले ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असून शाळा बंद असल्याने ३४ कोटी ७० लाख मुलांना पोषण आहार देखील मिळाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
तर गेल्या ६ महिन्यात ५ वर्षांहून कमी वयाची १० लाख २० हजाराहून अधिक मुले कुपोषणाचे बळी ठरण्याची भीती दर्शवली आहे. कोरोना महामारीमुळे लसीकरण मोहिमांवरही परिणाम झाले आहेत. यातुन एक वर्षांहून कमी वयाच्या ८ कोटी मुलांना आजार उद्भवू शकतात असे देखील अहवालात म्हणले आहे.
यात कोविडच्या संकटावर मात करण्यासाठी ‘जी-२०’ संघटनेने ८.०२ हजार अब्ज डॉलर मदत देण्याची घोषणा केली आहे. पण त्या मदतीपैकी केवळ ०.१३ टक्के म्हणजे १०.२ अब्ज डॉलरची मदत मिळाली असल्याने शिक्षण क्षेत्रावरही या मदतीअभावी परिणाम झाला आहे.