पाकिस्तानमध्ये एका महिलेवर तिच्या मुलांसमोर रस्त्यावर कार बंद पडल्यानंतर केलेल्या सामूहिक बलात्कारावर लोकांनी निषेध आणि निदर्शनं केली. मात्र एका पोलिस अधिकाऱ्याच्या विधानानंतर त्यामध्ये अजूनच ठिणगी पडली. या अधिकाऱ्याने ‘महिलेला एकटीने घराबाहेर पडण्यासाठी दोषी ठरवलं’, त्यामुळे पितृसत्ता आणि संकुचित मनोवृत्तीचं दर्शन शिक्षित लोकांमध्येही कायम आहे, हे दिसून येत आहे.
याबाबतीत १५ लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री १.३० वाजता लाहोरमधील रस्त्यावर ही घटना घडली होती. तत्पूर्वी या महिलेने इंधन संपल्यामुळे पोलिसांना फोनही केला होता. तीनं मदतीसाठी वाट पाहिली, मात्र त्यानंतर दोन लोकांनी तिच्या गाडीची काच तोडली. त्यानंतर तिच्या दोन्ही मुलांसमोर महिलेवर सामूहिक अत्याचार केला आणि दागिने, पैसे आणि बँक कार्डही चोरी केले.
मात्र, उमर शेख या पोलिस अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना केलेल्या विधानामुळे लोकांमधला रोष अधिकच वाढला. “स्त्रियांनी असं एकटीने बाहेर नाही गेलं पाहिजे,
पाकिस्तानमधील कोणीच आपल्या आईला किंवा बहिणीला असं बाहेर जाऊ देत नसेल. जातानादेखील तिने योग्य मार्ग निवडायला हवा होता आणि इंधन असल्याची खात्री करायला हवी होती.” असं विधान त्यांनी केलं.
पाकिस्तानच्या मानवी हक्क मंत्री शिरीन माझरी म्हणाल्या की, “या अधिकाऱ्याचं विधानं अगदीच अस्वीकार्य आहे.” “बलात्काराबाबत कोणताही तर्क लावणं चुकीचं आहे.”असंही त्या म्हणाल्या. शुक्रवारी याबाबत निदर्शनं करण्यात आली आणि महिला हक्क कार्यकर्त्यांनी शेख यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली.
याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी “घटनेस जबाबदार असलेल्यास लवकरात लवकर अटक करून शिक्षा द्यावी. अशा प्रकारचा जुलूम कोणत्याही सुसंस्कृत समाजात अजिबात सहन केला जाणार नाही.” अशी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, अशी विधानं करून आपण एक मागास आणि संकुचित समाज निर्माण करत असल्याची भीती अनेकांच्या प्रतिक्रियांतून जाणवत आहे.