आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या इन्फोसिस कंपनीच्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती रविवारी सोशल मीडियावर खूपच चर्चेत आल्या होत्या. कारण त्यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत होता. तर काय होता तो फोटो? ‘तर या फोटोमध्ये सुधा मूर्ती भाज्यांचा ढिगाऱ्यात बसल्या होत्या आणि त्यावर आपण श्रीमंत असल्याचं गर्व वाटू नये, म्हणून सुधाजी वर्षातून एकदा भाजी विकतात’ असं सांगण्यात आलं होतं.
तर या फोटोमागचं सत्य काय आहे? जाणून घेऊयात
हा फोटो आपण रिव्हर्स चेक करण्यासाठी गूगल रिव्हर्स इमेज सर्चचा उपयोग केल्यास हा फोटो २०१६ मधला असल्याचं दिसून येईल. त्यामुळे जो फोटोबरोबर मजकूर व्हायरल होतोय, तो मात्र खोटा आहे, हे समोर आलं आहे, परंतु तरीदेखील हा फोटो सुधा मूर्ती यांचं मोठेपण सांगणाराच आहे.
सुधा मूर्ती या घराजवळच असणाऱ्या राघवेंद्र स्वामी मंदिरामध्ये दरवर्षी सेवेसाठी जातात. तिथं त्या त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर भोजन, साफसफाई अशा प्रकारे सेवा करतात. त्यावेळी भोजनासाठी भाजी चिरत असताना २०१६ मध्ये तो फोटो काढला गेला होता, हे स्पष्ट झालं आहे.
“दान करणं सोपं आहे. परंतु प्रत्यक्ष उपस्थित राहून सेवा करणं नाही. मी शीख समाजाकडून अशा कार्याबाबत प्रेरणा घेते, त्यामुळेच मी अनेकदा दिल्लीतील गुरुद्वारामध्ये येणाऱ्या भाविकांच्या चप्पलांच्या स्टॅण्डजवळ बूट-चप्पल ठेवण्याचेही काम केलं आहे.” असं त्यांनी २०१३ मध्ये एका मुलाखतीत देखील सांगितलं होतं.
त्यामुळे व्हायरल फोटो हा दरवर्षी भाजी विकतानाचा नसून मंदिरातील सेवा करतानाचा आहे. दरम्यान सोशल मीडियावर पुन्हा पडताळणी न करता फॉरवर्ड केल्या गेलेल्या माहितीमुळे समाज माध्यमांवर प्रश्नचिन्ह उभी राहत आहेत.