मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळं राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत.
‘श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय’
राज्यात २८८ पैकी १८२ आमदार हे मराठा समाजाचे आहेत. हे सर्व आमदार श्रीमंत आहेत. त्यांचे एकमेकांशी नात्यागोत्याचे संबंध असून ते नात्यागोत्याचं राजकारण करतात आणि इतरांना राजकारणात येऊ देत नाहीत, असं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. इतकेच नव्हे तर राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नको आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
https://mobile.twitter.com/Prksh_Ambedkar/status/1305085613725548546
दरम्यान, गरीब मराठ्यांनी आरक्षण मिळावं म्हणून लढा उभा केला होता. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आता कोर्टात आहे.
‘श्रीमंत मराठा आमदारांच्या विरोधात उतरायला हवं’
श्रीमंत मराठे सत्ता असताना सुद्धा गरीब मराठ्यांच्या बाजूने लढत नाहीत. त्यामुळे माझं गरीब मराठ्यांना आवाहन आहे की त्यांनी श्रीमंत मराठा आमदारांच्या विरोधात उतरायला हवं. जर मराठा समाजाने असं केलं तरच त्यांना आरक्षण मिळेल. अन्यथा त्यांनी आरक्षणावर पाणी सोडावं, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.