संगणकाच्या क्षेत्रात दबदबा असणारी मायक्रोसॉफ्ट कंपनी सर्वांनाच माहीत असेल. आता मायक्रोसॉफ्ट एका नवीन प्रयोगाने चर्चेत आली आहे. तुमचा डेटा ऑनलाइन साठवण्यासाठी मोठ्या डेटा सेंटर्सची गरज असते.
या कंपनीची जगभरात अनेक डेटा सेंटर्स आहेत. मात्र या डेटा सेंटर्सची काळजी घेणे जोखमीचं काम असतं. या सेंटरमधील सर्वर सतत चालू असल्याने त्यांचं तापमान नियंत्रणात ठेवावं लागतं. तसेच ऊर्जेचा पुरवठा सतत करावा लागतो. त्याचबरोबर वातावरणातील आर्द्रता आणि ऑक्सिजनमुळं सर्वरला गंज लागण्याचा धोका देखील असतो. यावर उपाय शोधण्यासाठी मायक्रोसॉफ्टने हा नॅटिक प्रकल्प राबवला आहे.
नॅटिक प्रकल्पात डेटा सेंटर समुद्राशी तळाशी ठेवलं तर नेमकं काय होईल याचा अभ्यास केला जातोय. 2015 मध्ये कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनारी मायक्रोसॉफ्टने एअरटाईट कंटेनरमध्ये काही सर्वर समुद्रात फेकले. पाण्याखाली संगणक चांगल्याप्रकारे काम करतात का हे पाहण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता.
त्यानंतर 2018 मध्ये मायक्रोसॉफ्टने स्कॉटीश समुद्राच्या तळाशी एक डेटा सेंटर बुडवलं. त्यात 864 सर्वर होते व त्यांची एकूण क्षमता 27.6 पेटाबाईट इतकी होती. डेटा सेंटर समुद्राच्या 117 फूट खोलीवर बुडवण्यात आलं होतं. या प्रकल्पावर काम करणाऱ्या टीमचा असा अंदाज होता की पाण्याखाली सर्वर अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतात. तसंच ऊर्जेची देखील बचत होऊ शकते
आता या कंपनीचा अंदाज खरा ठरला असून पाण्याखाली डेटा सेंटर ठेवण्याची कल्पना फायदेशीर ठरली आहे.
काय आहे नेमका प्रयोग
एअर टाईट कंटेनरमध्ये डेटा सेंटर तयार केलं जातं. त्याच्यात अनेक सर्वर बसवले जातात. त्यानंतर तो कंटेनर समुद्राच्या तळाशी सोडला जातो. कंटेनर एअर टाईट असल्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचं पाणी जात नाही. त्याच बरोबर आजूबाजूला असणाऱ्या पाण्यामुळे आतील वातावरण थंड राहतं.
कंपनीचा दावा आहे की या प्रयोगामुळे समुद्रकिनारी असणाऱ्या शहरांमध्ये स्थानिक पातळीवर आणखी चांगली सुविधा देता येईल.
अजून हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर असून नॅटिक प्रकल्पावर काम करणाऱ्या टीमला समुद्र तळातून डेटा सेंटर काढून त्यांची दुरुस्ती करणे आणि नंतर रिसायकल करणे या गोष्टी शक्य आहेत हे दाखवायचं आहे.
क्लाऊड स्टोरेज तंत्रज्ञान म्हणजे काय?
सध्या आपला डेटा साठवण्यासाठी क्लाऊड स्टोरेजचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गुगल ड्राईव्ह हे एक क्लाऊड स्टोरेजचं उत्तम उदाहरण आहे. यामध्ये जेव्हा आपण एखादी माहिती गुगल ड्रायव्हर साठवतो तेव्हा ती आपल्या स्मार्टफोनची जागा व्यापत नाही. ही माहिती थेट गुगलच्या डेटा सेंटरमध्ये साठवली जाते. जगभरातून आपण कुठूनही त्या डेटाचा एक्सेस मिळवू शकतो. त्यामुळे या तंत्रज्ञानाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.