कोरोना विषाणूला संपूर्ण जग तोंड देत असताना चीनमध्ये एका नवीन विषाणूचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. वायव्य चीनमध्ये एका औषध निर्मिती कंपनीमधून लीक झालेल्या रसायनांमुळे ब्रुसेलोसिस या आजाराचा संसर्ग झाला आहे. यामुळे चीनमध्ये ब्रुसेलोसिस या आजाराचे हजारो रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.
गान्सू प्रांतातील लॅन्झू शहरातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ब्रुसेलोसिस या आजाराचे तीन हजार २३५ इतके रुग्ण आता पर्यंत चीनमध्ये आढळून आले आहेत.
या आजाराचा फैलाव नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच झाला असून यानंतर डिसेंबर पर्यंत ब्रुसेलोसिसचे १८१ रुग्ण आढळून आल्याची माहिती चीनमधील झिंग्वा या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे.
हवेमध्ये सोडण्यात आलेल्या गॅसमधून या विषाणूचा प्रसार होत आहे. कारखान्यामधून बाहेर फेकण्यात आलेल्या धूरामध्ये आणि गॅसमध्ये बॅक्टेरियांबरोबरच प्रक्रिया करण्यात आलेल्या रसायने आणि इतर द्रव्याचे सूक्ष्म थेंब होते. ज्यामुळे हे थेंब हवेत पसरल्याने अनेकांना ब्रसेलोसिसचा संसर्ग झाला आहे.
ग्लोबल टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०१९ ते २० ऑगस्टदरम्यान झॉनगुम लॅन्झू येथील जैविक औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्ये प्राण्यांना होणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रुसेला विषाणुंच्या मदतीने औषधांची निर्मीती करण्यात येत होती. याच औषध निर्मिती दरम्यान कारखान्यातील धूर आणि गॅस प्रक्रिया न करता तो बाहेर सोडण्यात आला असल्याने या आजाराची बाधा तेथील लोकांना झाली आहे.
काय आहे हा आजार?
या आजाराचे दुसरे नाव मेडिटेरियन फिव्हर असेही आहे. डोकं दुखणे, दिवसाआड ताप येणे, घसा खवखवणे ही या आजाराची लक्षणे असून हा आजार गुरे, शेळ्यांच्या माध्यमातून मानवाला होऊ शकतो. या विषाणूंमुळे मानवाच्या प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम होतो. तर युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अॅण्ड कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, वेळीच उपचार न मिळाल्याने ब्रसेलोसिसमुळे मृत्यूही होत असल्याचे सांगितले आहे.
तर, औषधांच्या मदतीने दिर्घकालीन उपाचारानंतर ब्रुसेलोसिस आजार ठीक होऊ शकतो. प्राण्यांना लस देणे, संसर्ग झालेल्या प्राण्यांना मारुन टाकणे तसेच दूध वगैरे सारखे दुग्धजन्य पदार्थांचे शुद्धीकरण करणे या माध्यमातून या विषाणूचा संर्सग रोखता येऊ शकत असल्याची माहिती युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अॅण्ड कंट्रोल दिली आहे.