महाराष्ट्रातील विरारमधला एक खेळाडू तब्बल 11 वेळा ‘आयर्नमॅन’ बनलाय. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारताचा झेंडा सातासमुद्रापार फडकवण्याची कामगिरी करणारा हा मराठमोळा खेळाडू म्हणजे हार्दिक पाटील. जगातील सर्वात अवघड स्पर्धांमध्ये आयर्नमॅन स्पर्धेचा समावेश होतो. अशा अवघड स्पर्धेत तब्बल 11 वेळा आयर्नमॅन किताब मिळवण्याची कामगिरी हार्दिक पाटील यांनी केली आहे.
काय असतं आयर्नमॅन स्पर्धेचं स्वरूप?
वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनकडून आयोजित करण्यात येणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत धावणं, पोहणं आणि सायकलिंग करणं यांचा समावेश असतो. 42.2 किलोमीटर धावणं 180.25 किलोमीटर सायकलिंग करणं आणि 3.86 किलोमीटर पोहणं असं स्वरूप असलेल्या आयर्नमॅन या स्पर्धेत हार्दिक पाटील यांनी तब्बल अकरा वेळा आयर्नमॅन हा किताब पटकावला आहे.
ही स्पर्धा मर्यादित वेळेत पूर्ण करायची असते. साधारण 16 ते 17 तास कालावधी दिलेला असतो. या कालावधीत पोहणं, धावणं आणि सायकलिंग करावं लागतं. जर या वेळेत पूर्ण केलं तरच आयर्नमॅनचा किताब मिळतो.
हार्दिक पाटील यांच्या नावावर अनेक विक्रम
एकाच वर्षात पाच वेळा आयर्नमॅन किताब पटकावणारे ते पहिले भारतीय
हार्दिक पाटील यांच्या नावावर अनेक विक्रम प्रस्थापित आहेत. सध्या आयर्नमॅन स्पर्धेत भारतात ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याच बरोबर एकाच वर्षात पाच वेळा आयर्नमॅन किताब पटकावणारे ते पहिले भारतीय आहेत. ही कामगिरी त्यांनी 2019 मध्ये केली होती.
टोकियो, बोस्टन, लंडन, शिकागो, बर्लिन आणि न्यूयॉर्क या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत आयर्नमॅनचा किताब पटकावला होता. तसंच हार्दिक पहिला भारतीय आहे – ज्याने एका वर्षात 6 फुल आर्यनमॅन पूर्ण केल्या, 2 आठवड्यात 2 फुल आर्यनमॅन पूर्ण केल्या आणि एकाच वर्षात 5 जागतिक मॅरेथॉन मेजर पूर्ण केल्या.
खरंतर आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी आवश्यक जीवनशैली तुम्हाला आत्मसात करावी लागते. हार्दिक पाटील यांनी लहानपणापासूनच खेळात आवड दाखवली होती. शाळेत असताना वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग नोंदवला होता.
तसेच वसई कला क्रीडा महोत्सवात अनेक पदकं आणि प्रमाणपत्र मिळवली होती. क्रिकेटची आवड असणाऱ्या हार्दिक पाटील यांनी वसई, विरार, नायगाव, आणि ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. कधीच हार मानू नका, असा संदेश हार्दिक पाटीलने तरुणांसाठी दिला आहे.