जगभरात कोरोनावर लस तयार करण्याची धडपड चालू आहे. आता सर्वांसाठी आनंदाची बातमी असून ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीची चाचणी सोमवारपासून पुण्यात घेण्यात येणार आहे. ही चाचणी अंतिम टप्प्यातील असून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्याकडून घेतली जाणार आहे.
भारतात या लसीचं उत्पादन करण्याचं काम सिरम इन्स्टिट्यूट करणार आहे. ही चाचणी पुण्याच्या ससून जनरल हॉस्पिटलमध्ये घेतली जाणार आहे.
‘कोवीशील्ड’ असं नामकरण केलेल्या या लसीच्या अंतिम टप्प्याची चाचणी सोमवारपासून पुण्यात येणार असल्याची माहिती ससून रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर मुरलीधर तांबे यांनी दिली. या वैद्यकीय चाचणीदरम्यान दीडशे ते दोनशे स्वयंसेवकांवर लसीचा प्रयोग करण्यात येणार आहे.
ऑक्सफर्ड आणि AstraZeneca यांच्यासोबत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने करार केला असून भारतात ही संस्था लसीचे उत्पादन करणार आहे.
दरम्यान ब्रिटनमध्ये या लसीची चाचणी सुरू असताना एका स्वयंसेवकाला त्रास झाला होता. त्यामुळे संपूर्ण जगभरात या लसीची चाचणी स्थगित करण्यात आली होती. भारतात देखील सिरम इन्स्टिट्यूटकडून चाचणी थांबवण्यात आली होती.
त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठाने लसीमुळे स्वयंसेवक आजारी पडला नसल्याची माहिती दिली. नंतर ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडून सिरम इन्स्टिट्यूटला भारतात चाचणी घेण्याची परवानगी दिली.