रशियामधील सायबेरिया या प्रांतातील एका दुर्गम तळ्यातील पाण्याचा रंग अचानक बदलून लाल झाला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. हे सर्वनाशाचं चिन्ह तर नाही ना? अशी भीती आणि प्रश्न लोकांना पडू लागले.
सायबेरिया मधील ‘बर्लिनस्कोए’ या तळ्यातील पाण्याचा व्हिडिओ बघून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. बायबलमध्ये दिल्या गेलेल्या सूचनेनुसार तर हे होत नाही ना? असं देखील अनेक लोकांनी म्हटलं आहे.
बायबलमधील साक्षात्कार या पुस्तकात सांगितलं आहे की, ज्यावेळी जगाचा सर्वनाश जवळ येईल त्यावेळी नद्या लाल होतील. त्यामुळे लोकांच्या अशा प्रतिक्रियांमध्ये नवल असं काही नाही.
यामध्ये काही तथ्य आहे का?
याबाबत तेथील स्थानिकांनी हे दरवर्षी घडतं असं सांगितलं आहे, त्यामुळे सर्वनाश वगैरे गोष्टींना पूर्णविराम मिळाला आहे.
पर्यटक दरवर्षी इथं तळ्याचं लाल झालेलं पाणी बघण्यासाठी गर्दी करत असतात. दरवर्षी जास्त उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा रंग हा लाल होत असतो असं समजत आहे.
काय आहे कारण?
बर्लिंस्कॉय तळ्यामध्ये असणाऱ्या ‘आर्टेमिया सॅलिना’ नावाच्या समुद्रातील कोळंबीच्या लहान जातीपासून हा रंग पाण्याला येतो.
ही कोळंबी गुलाबी रंगाचा द्रव हा पाण्यात सोडत असते आणि ज्यावेळी वातावरण जास्त उष्ण असतं त्यावेळी पाण्यात हा रंग जास्त उठून दिसतो.
हे काही असं एकच तळं नाही तर तुर्की आणि युएसमध्ये देखील अशा प्रकारची तळी आहेत. अशा प्रकारे सर्वनाश होण्याची चर्चा कॅलिफोर्निया मध्ये लागलेल्या आगीमुळे पूर्ण आकाश केशरी झाल्यानंतर देखील झाली होती.