बारामती ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 312 किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. यात चार आरोपींना अटक करण्यात आली असून 46 लाखांचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे . पुणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटस-भिगवण रोडवर मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन जाणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बारामती ग्रामीण पोलिसांनी उंडवडी येथील ‘ड्रायव्हर धाबा’ येथे एका अशोक लेलँड ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक न थांबता वेगाने बारामतीकडे निघून चालला होता. त्यादरम्यान बऱ्हाणपूर फाटा येथे पोलिसांनी ट्रकला अडवलं.
त्यानंतर पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता 312 किलो गांजा सापडला. त्याची किंमत 46 लाख एवढी आहे. विशाखापट्टनम आंध्र प्रदेश येथून हा गांजा आणला असून सातारा, सांगली जिल्ह्यात विक्रीसाठी आणले असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.