मराठी चित्रपट सृष्टीत ‘आशालता’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. आई माझी काळूबाई सेटवर कोरोनाचा शिरकाव झाला असून 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचादेखील समावेश होता. 22 सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास त्यांचं निधन झालं. त्या 79 वर्षाच्या होत्या.
सध्या साताऱ्यात आई माझी काळुबाई या मालिकेचे शूटिंग सुरू आहे. यादरम्यान आशालता साताऱ्याला आल्या होत्या. पण त्यांची सोमवारी अचानक प्रकृती बिघडल्याने सातारातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी कोरोनाने निधन झालं.
मालिकेत एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी मुंबईवरून एक डान्स ग्रुप बोलवण्यात आला होता. त्यांच्यामार्फतच या सेटवरच्या कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे.
कोण होत्या आशालता वाबगावकर
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा जन्म 2 जुलै 1941 ला गोव्यात झाला होता. त्यांनी कोकणी आणि मराठी नाटकांमधून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी आतापर्यंत 100 पेक्षा अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘अंकुश, अपने प्यार, आहिस्ता आहिस्ता, शौकीन, ओ सात दिन, नमक हलाल, यादों की कसम’ यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तर ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया’ या सारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं.